Blog | Chaturang Rangsamelan
Blog | Chaturang Rangsamelan Dainik Gomantak
ब्लॉग

Blog: 'चतुरंग'चे तिसावे रंगसंमेलन गोव्यात

दैनिक गोमन्तक

Blog: ‘चतुरंग प्रतिष्ठान’ या संस्थेचे दहावे रंगसंमेलन व त्यानिमित्ताने या संस्थेचे कार्य गोव्यात रुजवण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने कुणाकडे जात असेल, तर ते भारतरत्न स्व. लतादीदींना द्यावे लागेल. याचे कारण 2000 साली त्यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’ चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.

त्यांनी आपल्या वडिलांच्या जन्मशताब्दी वर्षातील हा सोहळा गोव्यातील लोकांमध्ये व्हावा, अशी इच्छा संस्थेच्या कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली व त्यांनीही दीदीच्या विनंतीला मान देऊन गोव्यात कोणीही कार्यकर्ता नसताना फक्त श्री. परेश जोशी, सौ. ललिता जोशी व श्री महेश आंगले या त्रयीच्या सहकार्याने व तत्कालीन मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या पाठिंब्यावर संपूर्ण मंगेशकर कुटुंबाला गोव्यात बोलावून रंगसंमेलन व त्यात दीदींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने सादर केला.

त्यावेळी आम्ही गोव्यातील कार्यकर्ते प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो, पण त्या कार्यक्रमाचे नेटके आयोजन कार्यकर्त्यांनी स्नेहपूर्ण व आतिथ्यशील वागणूक, पाहुण्यांविषयी व बाल कलाकरांविषयीची आदरभावना असे एकंदरीत सुसंस्कृत वातावरण आम्हा सर्वांच्या मनावर एक गारुड करून गेले.

आपल्यालाही या दर्जाचे कार्यक्रम सादर करता यावेत, अशी इच्छा निर्माण झाली. मध्ये दहा वर्षे गेली. 2010 साली संगीतज्ञ श्री. अशोकजी रानडे यांना विसावा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला. मागील दहा वर्षांत गोव्याचे श्री. कुमार सरज्योतिषी, ‘चतुरंग प्रतिष्ठान’ चे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. विद्याधर निमकर, सौ. मेघना काळे, श्री. विनायक काळे यांच्या संपर्कात होते. मुंबई येथील रंगसंमेलनाला हजेरी लावत होते.

दरम्यान, त्यांनी ‘चतुरंग’कडे विसावे रंगसंमेलन गोव्यात करण्याचा प्रस्ताव ठेवला व त्यांची संमती मिळवली. गोव्यातील 20-25 कार्यकर्त्यांनी मुंबई डोबिवली, चिपळूण येथील कार्यकर्त्यांच्या मदतीने ते रंगसंमेलन यशस्वी केले. त्यातूनच आम्हा गोव्यातील कार्यकर्त्यांनी नीटनेटक्या आयोजनाचे धडे मिळाले. 2010 मधील रंगसंमेलनातूनच आम्हाला गोव्यात चतुरंग संस्थेची शाखा स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.

सुरुवातीला आम्हाला चतुरंग गोवा अशी मान्यता मिळाली नव्हती. मात्र 2-3 वर्षे सलग विविध उपक्रम घडवून आणल्यावर, चतुरंग गोवा शाखेला मान्यता मिळाली. आता दरवर्षी 5-6 कार्यक्रम चतुरंग गोवा सादर करीत असते व त्यांची माहिती पूर्वीच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या रंगसंमेलनातील स्मरणिकेतून ‘उपक्रमचक्र’ या शीर्षकातून दिली जाते.

‘चतुरंग प्रतिष्ठान’ या संस्थेच्या कार्यक्रम करण्यातून आम्ही गोव्याचे कार्यकर्ते काय शिकलो? असे विचाराला तर मी एवढंच म्हणेन की, चतुरंग म्हणजे आमच्यासाठी व्यवस्थापनाचे विद्यापीठ आहे.(थट्टेने आम्ही श्री. विद्याधर निमकर यांच्या नावामुळे आम्ही त्याला ‘विद्याकाका युनिव्हर्सिटी’ असे म्हणत असतो.) या संस्थेचा कार्यकर्ता होण्यासाठी कोणताही सदस्यत्व अर्ज नाही, प्रवेश फी नाही अधिकारपद नाही.

‘जो कार्य करतो तो कार्यकर्ता सदस्य’ अशी याची व्याख्या आहे. दरवर्षी एक शिबिर घेतले जाते. ज्यामध्ये कार्यकर्त्याला व्यवस्थापन, वक्तृत्व, लेखन, समाजात वागण्यासाठीचे नियम, कार्यक्रमाच्या वेळी बाळगायची शिस्त इ. गोष्टींवर प्रबोधन केले जाते. संस्थेकडून कोणत्याही लाभाची अपेक्षा नसते, तर कार्यक्रम सादर करण्यातला व आपण त्याचा एक भाग होण्यातून निखळ आनंद हाच कार्यकर्त्यांचा स्वार्थ असतो.

कलाकार व रसिक प्रेक्षक यांना जवळ आणून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवणे हा आमचा बोनस असतो. चतुरंग ही संस्था आपल्या विविध उपक्रमांतून गोव्यातील कलाकारांना मुंबई, चिपळूण, रत्नागिरी इथे तर तेथील कलाकारांना गोव्यांत आपली कला पेश करण्याची संधी देत आली आहे. गोव्याच्या सुमेधा देसाई, डॉक्टर अजय वैद्य, दयानिधेश कोसंबे, राया कोरगांवकर , सिद्धी उपाध्ये यांनी चतुरंग व्यासपीठावरून गोव्याबाहेर गोव्याची कला पेश करून वाहवा मिळवली आहे.

रंगसंमेलने व इतर कार्यक्रम यातून गोव्यातील व गोव्याबाहेरील मोठमोठे कलाकार आम्हाला अनुभवता येतात हाही एक समाधानाचा भाग असतो. मात्र कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत सेल्फी काढणे किंवा पुढे पुढे करणे या गोष्टींना मुभा नसते. कार्यकर्ता गणवेशसुद्धा स्वतःच्या खर्चाने शिवतो, स्वतःसाठी फुकट पासेस घेत नाही.

कलाकारांचा मान राखून त्यांच्याशी कसे बोलावे. कसे वागावे याचे धडे या आयोजनांतून आम्हाला मिळत असतात. आयोजनातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचासुद्धा विचार करून पर्यायही विचारात घेतला जातो. म्हणूनच कोणीही एकदा चतुरंगच्या कार्यक्रमात येऊन गेलेला प्रेक्षक पुन्हापुन्हा येत राहतो. संस्था आतली की बाहेरची हा प्रश्न गौण ठरतो. कारण जे चांगले आहे ते कुठूनही घ्यावे, अशी शिकवण आहे.

या अभ्यासाचा आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारांत, व्यवसायात व नोकरीच्या ठिकाणीसुद्धा उपयोग होत असतो. रंगसंमेलन आयोजनात भाग घेणे ही आमच्यासाठी परीक्षा असते. यंदा तिसावे रंगसंमेलन गोव्यात पहिल्यांदा फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे रविवार दि. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत होणार आहे.

प्रसिद्ध सिने दिग्दर्शक श्री. राजदत्त यांना सिने अभिनेता श्री. अनुपम खेर यांच्या हस्ते डॉ. प्रमोद सावंत, डॉ. विनय सहस्रबद्धे, श्री विजय कुवळेकर, श्री सुधीर जोगळेकर, डॉ. अजय वैद्य यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. गोवेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून गोवा चतुरंगला कार्यक्रम सुविहित आयोजित करण्याचा आनंद मिळवून द्यावा. आपले स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

पेरु देशाचा मोठा निर्णय! ट्रान्स लोकांना केले 'मानसिक रुग्ण' घोषित; सरकार देणार मोफत उपचार

SCROLL FOR NEXT