Penalty For Sharing SIM Cards 3 Years Jail 50 Lakh Fine: आजच्या डिजिटल युगात मोबाईल सिम कार्ड आपल्या आयुष्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनले आहे. परंतु, जर तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड तुम्ही इतर कोणाला वापराला, विकायला किंवा भाड्याने दिले असेल, तर आताच सावध होण्याची अत्यंत गरज आहे. तुमच्या नावावर सुरु असलेल्या सिम कार्डचा वापर करुन जर कोणताही सायबर फ्रॉड किंवा बेकायदेशीर कृत्य झाले, तर पोलिसांची कठोर कारवाई थेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. दूरसंचार विभागाने सिम कार्डशी संबंधित नियमांबाबत लोकांना पुन्हा एकदा अत्यंत कडक इशारा दिला.
बनावट ओळखपत्राचा वापर करुन सिम खरेदी-विक्री करणे किंवा मोबाईलच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड करणे आता महागात पडू शकते, ज्यासाठी थेट 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाखांपर्यंतचा मोठा दंड होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आपल्या नावावर नेमके किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, हे एकदा तातडीने तपासून घेणे गरजेचे आहे.
तुम्हाला घरबसल्या तुमच्या नावावर किती आणि कोणती सिम चालू आहेत हे तपासायचे असेल, तर तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने हे करु शकता.
सर्वप्रथम आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर sancharsaathi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
होमपेजवर दिलेल्या 'Know Your Mobile Connections' (TAFCOP) या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाका आणि फोनवर आलेला वन-टाइम पासवर्ड (OTP) प्रविष्ट करुन सबमिट करा.
लॉगिन केल्यानंतर तुमच्या ओळखपत्रावर (ID) नोंदणीकृत असणाऱ्या सर्व सक्रिय मोबाईल नंबरची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
या यादीमध्ये जर तुम्हाला एखादा असा नंबर दिसला ज्याला तुम्ही ओळखत नाही किंवा जो तुम्ही वापरत नाही, तर त्या नंबरवर क्लिक करुन 'Not My Number' किंवा 'Report' या पर्यायाची निवड करा. त्यानंतर सरकारकडून त्या नंबरची तपासणी करुन तो ब्लॉक करण्याची कारवाई केली जाईल.
छत्तीसगडमध्ये नुकत्याच समोर आलेल्या एका मोठ्या सायबर (Cyber) फसवणुकीच्या प्रकरणानंतर दूरसंचाराने ही कडक ॲडव्हायजरी जारी केली. तिथे एका सिम कार्ड विक्रेत्याने ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन त्यांच्या नकळत तब्बल 25 बनावट सिम कार्ड सक्रिय केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार समोर आल्यानंतर विभागाने संबंधित एजंटला काळ्या यादीत (Blacklist) टाकले असून, फेर-पडताळणीत (Re-verification) अपयशी ठरलेले हे सर्व 25 बनावट नंबर तात्काळ बंद करण्यात आले आहेत.
दूरसंचार विभागाने स्पष्ट शब्दात बजावले की, स्वतःच्या नावावर सिम कार्ड घेऊन ते इतर कोणाला वापरण्यासाठी देणे, विकणे, भाड्याने देणे किंवा सायबर गुन्ह्यात वापरु देणे या सर्व गंभीर बाबी आहेत. जर तुमच्या नावाच्या सिमवरुन कोणताही गुन्हा घडला, तर कायदेशीर कारवाईत तुमचे नाव गोवले जाऊ शकते. बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम घेणे, ओळख लपवून फसवणूक करणे हा अत्यंत गंभीर आणि दंडात्मक अपराध मानला जातो.
अनेक प्रकरणांमध्ये सायबर ठग लोकांच्या ओळखपत्राचा गैरवापर करुन सिम कार्ड काढून घेतात. काहीवेळा पैशांचे आमिष दाखवून लोकांकडून त्यांच्या नावावर सिम कार्ड घेतले जाते आणि नंतर या सिमचा वापर अंमली पदार्थांची तस्करी, ऑनलाइन फसवणूक किंवा इतर गंभीर गुन्ह्यांसाठी केला जातो. अशा प्रकारच्या सिमला 'म्यूल सिम' म्हटले जाते. त्यामुळे आपल्या नावावरील कागदपत्रांचा वापर कोठेही सुरक्षितपणेच करणे गरजेचे ठरेल.
या ॲडव्हायजरीमध्ये मोबाईलच्या आयएमईआय नंबरसंदर्भातही कडक इशारा देण्यात आला. ज्या फोनच्या आयएमईआय नंबरमध्ये छेडछाड किंवा फेरफार करण्यात आला, अशा उपकरणाचा वापर करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. याशिवाय, कॉल करताना स्क्रीनवर दुसऱ्याची खोटी नंबर दाखवणारे ॲप्स किंवा वेबसाईट वापरणे हा देखील गुन्हा आहे. सरकारने या प्रकारच्या सर्व टूल्सना देशाची सुरक्षा आणि टेलिकॉम नेटवर्कसाठी मोठा धोका घोषित केला.
भारतातील नियमांनुसार एका सामान्य व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड ठेवण्याची मर्यादा आहे. मात्र, जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांसाठी ही मर्यादा 6 सिम कार्डची आहे. नवीन सिम देताना कंपन्या ग्राहकांच्या नावावर आधीपासून किती कनेक्शन्स आहेत याची पडताळणी करतात. तसेच, डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्मवर नव्या फीचर्समुळे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिम असणाऱ्यांची माहिती डीलर्सना मिळणार असून, 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सर्व कंपन्यांना आपले सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.