नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी खळबळ उडणार आहे. दक्षिण कोरियाची दिग्गज कार उत्पादक कंपनी 'किआ' (Kia) आपल्या लोकप्रिय एसयुव्ही 'सेल्टोस'चे नवीन जनरेशन मॉडेल २ जानेवारी २०२६ रोजी भारतात लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, २०२६ या वर्षात भारतीय बाजारपेठेत दाखल होणारी ही पहिली कार ठरणार आहे. या कारच्या आगमनामुळे मिड-साईज एसयुव्ही सेगमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार असून ह्युंदाई क्रेटा आणि टाटा नेक्सॉन सारख्या प्रस्थापित गाड्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
नवीन किआ सेल्टोस २०२६ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतील. ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा ९५ मिमी लांब आणि ३० मिमी रुंद आहे. तिचे डिझाइन जागतिक स्तरावर गाजलेल्या 'किआ टेलुराईड' (Kia Telluride) पासून प्रेरित आहे.
यामध्ये नवीन ग्रिल, वर्टिकल गन-मेटल फिनिश आणि चौकोनी आकाराचे हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. कारचा लूक अधिक स्पोर्टी करण्यासाठी १८-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस आकर्षक 'L' आकाराचे एलईडी टेललॅम्प्स दिले आहेत.
कारच्या केबिनमध्ये ग्राहकांना लक्झरी अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये १२.३ इंचाची मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि तितक्याच आकाराचे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असलेले पॅनोरॅमिक डिस्प्ले सेटअप आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात 'लेव्हल २ ADAS' तंत्रज्ञान, ३६०-डिग्री कॅमेरा आणि मेमरी फंक्शनसह पॉवर्ड सीट्स यांसारखी आधुनिक फीचर्स जोडण्यात आली आहेत.
इंजिनमध्ये कोणताही बदल न करता कंपनीने विश्वासार्हता कायम ठेवली आहे. यात १.५ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, १.५ लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध असतील.
सुरुवातीच्या मॉडेलची किंमत साधारणपणे १०.७९ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते, तर हाय-एंड व्हेरियंट २० लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कारचे बुकिंग २५,००० रुपयांत सुरू असून जानेवारीच्या मध्यापासून डिलिव्हरीला सुरुवात होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.