नोकरी मिळवण्यासाठी सध्या तरुणांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुठे अर्ज करूनही उत्तर मिळत नाही, तर कुठे अनेक फेऱ्यांच्या मुलाखतीनंतरही उमेदवारांना नकार दिला जातो. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक अनुभव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एका व्यक्तीने कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला नव्हता, मुलाखतही दिली नव्हती. तरीही त्याला संबंधित कंपनीकडून रिजेक्शनचा संदेश मिळाला. विशेष म्हणजे, ज्या पदासाठी त्याने अर्जच केला नव्हता, त्याच पदासाठी दुसऱ्या उमेदवाराची निवड झाल्याचे त्याला कळवण्यात आले. या विचित्र प्रकाराची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
या संपूर्ण प्रकाराची सुरुवात LinkedIn या व्यावसायिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झाली. संबंधित व्यक्तीला एका रिक्रुटरने कंपनीतील रिक्त पदासाठी संपर्क साधला होता. त्याने नोकरीसंदर्भातील माहिती आणि जबाबदाऱ्या वाचल्या.
मात्र, संबंधित काम आपल्या कौशल्यांना आणि आवडीला अनुरूप नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने रिक्रुटरच्या मेसेजला उत्तर न देण्याचा निर्णय घेतला. त्याने या संधीमध्ये रस दाखवला नाही किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली नाही.
काही दिवसांनंतर या व्यक्तीला त्याच रिक्रुटरचा पुन्हा एकदा मेसेज आला. यावेळी कंपनीने संबंधित पदासाठी दुसऱ्या उमेदवाराची निवड केल्याचे त्याला सांगण्यात आले. तसेच त्याच्या वेळेबद्दल आभारही मानण्यात आले. हा संदेश वाचल्यानंतर संबंधित व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याने या नोकरीसाठी अर्जच केला नव्हता. भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यात तो सहभागी झाला नव्हता. तरीही कंपनीकडून त्याला नकार मिळाल्याचा संदेश पाठवण्यात आला होता.
हा प्रकार त्याला इतका मजेशीर आणि विचित्र वाटला की त्याने आपला अनुभव Reddit वरील r/jobs या कम्युनिटीमध्ये शेअर केला. अर्ज न करताच नकार मिळण्याची वेळ आल्याचे सांगत त्याने भरती प्रक्रियेतील या अनुभवावर उपरोधिक भाष्य केले.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने सध्याच्या नोकरीच्या बाजारपेठेवर टोला लगावत म्हटले की, आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वीच नकार मिळू लागला आहे.
तर दुसऱ्या एका व्यक्तीने आपला असाच अनुभव सांगितला. एका कंपनीने त्याला मुलाखतीच्या प्रक्रियेबाबत फीडबॅक मागणारा ईमेल पाठवला होता. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने संबंधित कंपनीची मुलाखत कधी दिलीच नव्हती. तरीही कंपनीच्या ईमेलमध्ये त्याच्या वेळेबद्दल आणि प्रयत्नांबद्दल आभार मानण्यात आले होते.
काही युजर्सनी हा प्रकार संभाव्य जॉब स्कॅम किंवा कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या ऑटोमेटेड मेसेज सिस्टीमचा परिणाम असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. काहींच्या मते, रिक्रुटरने पाठवलेले संदेश स्वयंचलित प्रक्रियेतून गेले असावेत.
या चर्चेदरम्यान आणखी एका युजरने आपला अनुभव सांगितला. त्याने कॉलेज पूर्ण करताना एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्याला नकार मिळाला होता. विशेष म्हणजे, त्यानंतर त्याने त्या कंपनीत पुन्हा कधीही अर्ज केला नाही. तरीही पुढील चार वर्षे दरवर्षी त्याला त्याच कंपनीकडून रिजेक्शनचा ईमेल येत राहिला.
या घटनांमुळे भरती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या स्वयंचलित संदेश प्रणाली आणि उमेदवारांशी होणाऱ्या संवादाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी प्रत्येक संधी महत्त्वाची असते. अशा वेळी अर्ज न करताच नकाराचे संदेश मिळणे हा प्रकार नक्कीच संभ्रम निर्माण करणारा आहे. सोशल मीडियावरील या अनुभवामुळे जॉब मार्केटमधील विचित्र परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.