

Boman Irani Donald Trump Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या 'सुप्रीम लीडर' संदर्भात केलेल्या दाव्याची जगभरात चर्चा सुरु असतानाच, दिग्गज अभिनेते बोमन इराणी यांनी यावर एक अत्यंत विनोदी व्हिडिओ शेअर केला. ट्रम्प यांनी इराणसोबत वाटाघाटी सुरु असल्याचे म्हटले होते, ज्याचा संदर्भ घेत बोमन यांनी आपल्या इराणी/पारशी मुळांचा उल्लेख करत ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. मात्र, या विनोदी विधानामुळे अभिनेत्री मंदाना करीमी संतापली असून तिने बोमन इराणी यांना खडे बोल सुनावले.
बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, "सध्या अशी चर्चा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना 'इराणी' लोकांशी बोलायचे आहे. यासाठी तीन लोकांची निवड झाल्याचे समजते - स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि मी स्वतः. मी शांततेसाठी काहीही करायला तयार आहे, पण मी वॉशिंग्टनला जाणार नाही. ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाने दादरच्या पारशी कॉलनीत यावे. आम्ही त्यांना धनसाक आणि कस्टर्ड खाऊ घालू. गॅस सिलिंडरची व्यवस्थाही करु, ज्यामुळे सर्वांचे जीवन सुरळीत होईल." बोमन यांचा हा उपरोधिक व्हिडिओ इराणने अमेरिकेसोबतची कोणतीही बोलणी सुरु असल्याचा दावा फेटाळल्यानंतर आला.
मात्र, इराणी यांचा हा विनोद इराणमध्ये जन्मलेल्या अभिनेत्री मंदाना करीमीला रुचला नाही. तिने कमेंट सेक्शनमध्ये बोमन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. मंदानाने लिहिले की, "बोमन इराणी सर, अचानक तुम्हाला इराणबद्दल बोलायला खूप काही सुचत आहे. वर्षानुवर्षे इराणी लोक अटक होत आहेत, मारले जात आहेत आणि त्यांना गप्प केले जात आहे. आम्ही हा संघर्ष अनुभवला आहे. जेव्हा इराणमधील लोक मरत होते, तेव्हा तुमचा हा आवाज कुठे होता? आता जेव्हा गॅस, राजकारण आणि जागतिक चर्चांवर परिणाम होत आहे, तेव्हा तुम्ही उपहासात्मक व्हिडिओ बनवत आहात. मौनापासून उपहासापर्यंतचा तुमचा हा प्रवास कौतुकास्पद आहे."
एकीकडे अनेक सेलिब्रिटींनी बोमन यांच्या व्हिडिओवर हसून दाद दिली असली तरी मंदानाने उपस्थित केलेल्या प्रश्नांनी इराणमधील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. इराणने अमेरिकेसोबतच्या कोणत्याही कराराचा अहवाल 'स्वतःशीच केलेली वाटाघाटी' म्हणून फेटाळून लावला. इराणच्या प्रवक्त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले की, तुमच्या अपयशाला कराराचे नाव देऊ नका. मात्र, ट्रम्प आजही इराणला कराराची अत्यंत गरज असून योग्य लोकांशी चर्चा सुरु असल्याच्या आपल्या दाव्यावर ठाम आहेत.
एका बाजूला आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्धाचे सावट असताना बोमन इराणींचा हा उपरोध आणि त्यावर मंदाना करीमीने दिलेली ही टोकदार प्रतिक्रिया सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.