Vikram Gokhle Death: अष्टपैलू, देखणे, आणि रुबाबदार अभिनेते म्हणून प्रसिद्ध असणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी दुःखद निधन झाले, त्यांच्या आकस्मिक निधनाने रसिकांना मोठा धक्का बसला आहे. 14 नोव्हेंबर 1945 रोजी जन्मलेले विक्रम गोखले यांना अभिनयाचे बाळकडू त्यांच्या कुटुंबातूनच मिळाले असले तरी त्यांनी विजया मेहता यांच्याकडून अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी भूमिका केलेले बॅरिस्टर हे नाटक त्या काळात खूप गाजले.
दरम्यान, या भूमिकेद्वारे मराठी रंगभूमीला एक उमदा अभिनेता लाभला ज्याने पुढे अनेक दशके रंगभूमीवर अधिराज्य गाजवले. त्यांना जी भूमिका मिळत त्या भूमिकेचा आधी ते बारकाईने अभ्यास करीत आणि आपल्या आकलन आणि निरीक्षण शक्तीच्या जोरावर त्या भूमिकेवर आपला ठसा उमटवत. केवळ नाटकातच नव्हे तर चित्रपट असो वा दूरचित्रवाणीवरील मालिका प्रत्येक भूमिका स्वीकारताना ते हीच पद्धत वापरत म्हणूनच त्यांनी केलेल्या भूमिका रसिकांच्या मनात कोरल्या जात. मग ती माहेरच्या साडीतील कठोर मनाच्या वडिलांची भूमिका असोत की अग्निपथमधील हळव्या मनाच्या जेलरची भूमिका असो. आपल्याला मिळालेल्या भूमिकेच्या लांबीपेक्षा खोली किती मोठी आहे हे ते पाहत, त्यामुळेच त्यांच्या लहान लहान भूमिका देखील रसिकांच्या लक्षात राहिल्या.
तसेच, नाटक आणि चित्रपटात (Movie) त्यांनी केलेल्या भूमिकेप्रमाणेच टीव्ही मालिकेत त्यांनी केलेल्या भूमिका देखील गाजल्या. टीव्हीवरील 'अग्निहोत्र' या मालिकेत त्यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्र हे पात्र आजही रसिकांच्या मनात घर करुन गेले. त्यांनी केलेल्या भूमिकेसोबतच त्यांनी केलेले सामाजिक कार्य देखील मोठे आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक जाण असलेला एक श्रेष्ठ, अष्टपैलू कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
2010 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला
2010 मध्ये 'अनुमती' या मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना 2010 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी 'आघात' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. विक्रम गोखले शेवटचे अभिमन्यू दासानी आणि शिल्पा शेट्टी स्टारर 'निकम्मा' या चित्रपटात दिसले होते.
वयाच्या 26 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण
विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 1971 मध्ये अमिताभ बच्चन स्टारर 'परवाना' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. गोखले यांनी अनेक मराठी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात 1990 मध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'अग्निपथ' आणि 1999 चा सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.