Shivsena : ‘ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीच्या मैदानात यावे, मी मशाल घेऊन तुमच्यासमोर येतो,’ असे आव्हान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले. आता रक्त पेटले असून निवडणुकीसाठी तयार राहा, असे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. ता.19 रोजी ठाकरे हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर शनिवारी ‘मातोश्री’बाहेर कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो, अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे कारमधून कलानगरच्या प्रवेशद्वारावर आाले. यावेळी कारच्या रूफमधून बाहेर येत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मागील 75 वर्षांत कोणत्याच पक्षावर असा आघात झाला नाही.
तेव्हा निवडणुकीच्या तयारीला लागा,’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, एकेकाळी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली होती.
बाळासाहेबांची आठवण
उद्धव ठाकरेंनी ओपन जीपवरून भाषण केल्यामुळे भावनिक झालेल्या शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली आहे. 30 ऑक्टोबर 1968 साली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली होती.
त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी थेट ओपन जीपच्या बोनेटवर चढून शिवसैनिकांना संबोधित केले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी तशाच प्रकारे शिवसैनिकांशी संवाद साधल्यामुळे शिवसैनिक भावनिक झाले होते.
शिवसेनेच्या धनुष्यबाणाची चोरी झाली आहे. हे चोर कोण आहेत? याचा तपास आम्ही करत आहोत. यासाठी दिल्लीतील एखाद्या महाशक्तीने काय मदत केली? हे पडताळून पाहात आहोत. याची माहिती लवकरच जनतेसमोर आणू. -खा. संजय राऊत, ठाकरे गटाचे नेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.