Yuzvendra Chahal record: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी (७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने अखेरच्या चेंडूवर ४ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. पण असे असले तरी राजस्थानचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने ऐतिहासिक कामगिरी केली.
त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना २९ धावा देत ४ विकेट्स घेतले. त्यामुळे आता आयपीएल कारकिर्दीत त्याच्या नावावर 142 सामन्यांत ७.६५ च्या इकोनॉमी रेटसह १८३ विकेट्सने नोंद झाली आहे.
त्याचमुळे त्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असेलल्या ड्वेन ब्रावोची बरोबरी केली आहे. ब्रावोने आयपीएलमध्ये १६१ सामन्यांमध्ये ८.३८ च्या इकोनॉमी रेटसह १८३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता पुढील सामन्यांमध्ये चहलला ब्रावोला मागे टाकण्याचीही संधी असणार आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (७ मे २०२३ पर्यंत)
१८३ विकेट्स - युजवेंद्र चहल (१४२ सामने)
१८३ विकेट्स - ड्वेन ब्रावो (१६१ सामने)
१७४ विकेट्स - पीयुष चावला (१७५ सामने)
१७२ विकेट्स - अमित मिश्रा (१६० सामने)
१७१ विकेट्स - आर अश्विन (१९५ सामने)
१७० विकेट्स - लसिथ मलिंगा (१२२ सामने)
हैदराबादचा विजय
दरम्यान रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर (९५) आणि कर्णधार संजू सॅमसन (६६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकात 2 बाद 214 धावा केल्या होत्या.
त्यानंतर २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या चेंडूवर हैदराबादला ५ धावांची गरज होती. त्यावेळी अब्दुल सामदने संदीप शर्माने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका खेळला, पण त्याचा झेल बटलरने घेतला होता. पण त्याचवेळी तिसऱ्या पंचांकडून हा नो-बॉल असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हैदराबादला दुसरी संधी मिळाली. ही संधी मात्र सामदने गमावली नाही. त्याने अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि हैदराबादला विजय मिळवून दिला.
तत्पुर्वी हैदराबादकडून अभिषेक शर्माने ५५ आणि राहुल त्रिपाठीने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याशिवाय हेन्रिक क्लासेनने १२ चेंडूत २६ धावांची आणि ग्लेन फिलिप्सने ७ चेंडूत २५ धावांची तुफानी खेळी केली. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.