IPL 2023: कॅच, नो-बॉल अन् मग सिक्स... हैदराबादने राजस्थानकडून हिरावला विजय, बटलरच्या 95 धावा व्यर्थ

आयपीएल २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला.
Abdul Samad
Abdul SamadDainik Gomantak
Published on
Updated on

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी 52 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अखेरच्या चेंडूवर 4 विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादचा हा 10 सामन्यांतील चौथा विजय ठरला आहे.

या सामन्यात राजस्थानने हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादने 6 विकेट्स गमावत अखेरच्या चेंडूवर पूर्ण केला. महत्त्वाचे म्हणजे सवाई मानसिंग स्टेडियमवर पहिल्यांदाच आयपीएलमध्ये 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे.

या सामन्यात अखेरच्या षटकात हैदराबादला 17 धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थानकडून संदीप शर्मा गोलंदाजी करत होता. तसेच हैदराबादकडून मार्को यान्सिन आणि अब्दुल सामद फलंदाजी करत होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सामदने यान्सिनसह 2 धावा पळून काढल्या. त्यानंतर त्याने षटकार ठोकत धावांचे अंतर कमी केले. तिसऱ्या चेंडूवरही दोन धावा आल्या. यानंतर पुढच्या दोन्ही चेंडूवर सामद आणि यान्सिन यांना एक-एक धावच घेता आली. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर हैदराबादला 5 धावांची गरज होती.

यावेळी संदीपने टाकलेल्या चेंडूवर सामदने मोठा फटका खेळला, पण त्याचा झेल बटलरने घेतला होता. त्यामुळे सर्वांना वाटले राजस्थान जिंकले, पण त्याचवेळी तिसऱ्या पंचांकडून हा नो-बॉल असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे हैदराबादला दुसरी संधी मिळाली. ही संधी मात्र सामदने गमावली नाही. त्याने अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि हैदराबादला विजय मिळवून दिला.

Abdul Samad
IPL 2023: दिल्लीच्या फलंदाजांचा बेंगलोरला 'दे धक्का'! सॉल्टच्या 87 धावा अन् DC ने साकारला चौथा विजय

या सामन्यात राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून अनमोलप्रीत सिंग आणि अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी करत सुरुवात चांगली दिली. पण चांगल्या सुरुवातीनंतर अनमोलप्रीतने 6 व्या षटकात 33 धावांवर विकेट गमावली.

पण त्यानंतर अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादचा डाव पुढे नेला. त्यांनीही अर्धशतकी भागीदारी करत हैदराबादला 100 धावांचा टप्पा सहज पार करुन दिला. यादरम्यान अभिषेकने अर्धशतकही पूर्ण केले. पण त्याला 13 व्या षटकात आर अश्विनने बाद केले. अभिषेकने 34 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावा केल्या. अभिषेक आणि त्रिपाठी यांच्यात 65 धावांची भागीदारी झाली.

नंतर त्रिपाठी आणि हेन्रिक क्लासेन यांचीही भागीदारी रंगली होती. क्लासेननेही आक्रमक खेळ केला होता. पण तो खेळपट्टीवर स्थिरावलेला असतानाच त्याला युजवेंद्र चहलने फिरकीच्या जाळ्यात अडकवले. क्लासेन 12 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच 18 व्या षटकात 29 चेंडूत 47 धावा करणाऱ्या त्रिपाठीलाही चहलने बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला होता. याच षटकात हैदराबादचा कर्णधार मार्करमलाही चहलने केवळ 6 धावांवर माघारी धाडले. त्यामुळे हैदराबाद संघ अडचणीत सापडला होता.

पण त्यानंतर 19 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलिप्सने हल्ला चढवला. त्याने या षटकात पहिल्या चार चेंडूंवर सलग तीन षटकार आणि एक चौकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर फिलिप्स बाद झाला. पण तोपर्यंत त्याने विजय हैदराबादच्या दृष्टीक्षेपात आणून दिला होता. त्यानंतर अखेरच्या षटकात अब्दुल सामदने आक्रमक खेळ करत हैदराबादला विजय मिळवून दिला. फिलिप्सने 7 चेंडूत 25 धावा केल्या.अब्दुल सामद 7 चेंडूत 17 धावा करून नाबाद राहिला. तसेच मार्को यान्सिन 3 धावांवर नाबाद राहिला.

राजस्थानकडून युजवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी करताना 4 षटकात 29 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Abdul Samad
Virat Kohli in IPL: किंग कोहलीने फिफ्टी ठोकत घातला विक्रमांचा रतीब! IPL मध्ये 'हा' कारनामा करणारा पहिलाच

तत्पुर्वी, राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी दमदार सुरुवात दिली होती. त्यांनी 5 षटकांमध्येच 50 धावांचा टप्पा ओलांडला होता. पण पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जयस्वाल मार्को यान्सिनविरुद्ध खेळताना टी नटराजनकडे झेल देत बाद झाला. जयस्वालने 18 चेंडूत 35 धावांची खेळी केली.

यानंतर जोस बटलरला कर्णधार संजू सॅमसनने चांगली साथ दिली. या दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू न देता शतकी भागीदारी केली. पण बटलर शतकाच्या जवळ आला असतानाच 19 व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याचे शतक केवळ 5 धावांनी हुकले. त्याने 59 चेंडूत 95 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले.

बटलर आणि सॅमसन यांच्यात 138 धावांची भागीदारी झाली. यानंतर संजू सॅमसन आणि शिमरान हेटमायरने मिळून राजस्थानला 200 धावांचा आकडा पार करून दिला. सॅमसन 38 चेंडूत 66 धावांवर नाबाद राहिला. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. तसेच हेटमायरल 7 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 214 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com