

Yuvraj Singh Video: जगभरातील अनेक माजी खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय आहेत. यामध्ये दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचाही समावेश आहे. युवराज अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा शेअर करताना दिसतो. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
युवराजचा व्हिडिओ चर्चेत
युवराजने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्याबरोबर त्याची आई आणि धाकटा भाऊ झोरावर देखील दिसत आहे. हा गमतीशीर व्हिडिओ असून यामध्ये युवराज आणि झोरावरला त्यांची आई धक्के देऊन बाहेर काढत आहे.
या व्हिडिओवर युवराजने लिहून त्यांना घराबाहेर काढण्याचे कारण स्पष्ट केले आहे. त्याने सांगितले आहे की त्यांच्या आईने त्यांना भाजी आणण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी कोथिंबीर ऐवजी पुदीना आणला. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
या विनोदी व्हिडिओला युवराजने कॅप्शन दिले आहे की 'सांगा आम्ही काही चुकीचे केले का?' त्यांच्या या व्हिडिओवर युजर्सकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
युवराजने यापूर्वीही अनेकदा असे मजेशीर व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान, युवराजने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने तो आता जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो.
मोठ्या स्पर्धांचा खेळाडू
युवराजला मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणूनही ओळखले जाते. त्याने भारतीय संघाला 2007 चा टी20 वर्ल्डकप आणि 2011 सालचा वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याला 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता. इतकेच नाही, तर युवराज 2000 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.
याचबरोबर 2002 साली चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेसह संयुक्तपणे विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाचाही युवराज भाग होता. विशेष म्हणजे 19 वर्षांखालील वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशी मोठी विजेतीपदे जिंकणाऱ्या संघाचा भाग होण्याचा दुर्मिळ मान युवराजला मिळाला आहे.
युवराजने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 कसोटी सामन्यांत 3 शतके आणि 11 अर्धशतकांसह 1900 धावा केल्या आहेत. तसेच 9 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने वनडेत 304 सामने खेळले असून 8701 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 14 शतकांचा आणि 52 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने वनडेत 111 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर युवराजने 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 8 अर्धशतकांसह 1177 धावा केल्या आहेत आणि 28 विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.