Yashasvi Jaiswal family shifed to new five-bedroom flat: भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध डॉमिनिकाला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात यशस्वी जयस्वालने महत्त्वाचा वाटा उचलला.
दरम्यान, हा सामना तो खेळत असतानाच 13,700 किलोमीटर दूर त्याचे कुटुंब मात्र नव्या घरात रहायला जाण्यात व्यस्त होते. 21 वर्षीय जयस्वालने या सामन्यात विक्रमी शतक केले. जयस्वालसाठी भारतीय संघापर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता.
उत्तर प्रदेशमधून मुंबईत आल्यानंतर त्याला बराच संघर्ष करावा लागला. अगदी पाणीपुरीचा ठेलाही चालवावा लागला. पण त्याने ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवताना आधी वयोगटातील क्रिकेट गाजवले. त्यानंतर मुंबईकडून वरिष्ठ संघाकडूनही शानदार कामगिरी केली.
आयपीएल 2023 मध्येही त्याने शानदार कामगिरी करत सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही जिंकला. आता त्याने भारतीय संघात स्थान मिळवले असून पहिल्याच सामन्यात शतकही झळकावले.
दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यावरून जयस्वालने ठरवले होते की परत जायचे ते नवीन घरात. तो गेल्या दोन वर्षापासून त्याच्या कुटुंबासमवेत सांताक्रुजमध्ये भाड्याने दोन बेडरुमच्या घरात राहात होता. पण आता त्याचे कुटुंब 5 बेडरुमच्या घरात शिफ्ट झाले आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीतल यशस्वीचा भाऊ तेजस्वीने माहिती दिली की 'यशस्वी आम्हाला सातत्याने सांगत होता की प्रीज लवकर शिफ्ट करा, मला या घरात नाही रहायचे. अगदी कसोटी सामन्यादरम्यानही तो सातत्याने आम्हाला आमच्या शिफ्टिंगच्या योजनांबद्दल विचारत होता.'
'त्याची आत्तापर्यंत आयुष्यात एकच इच्छा होती की त्याचे स्वत:चे घर असावे. तुम्हाला तो कसा वर आला आहे, हे माहित आहे. त्याला डोक्यावर छप्पर असण्याची महत्त्व कळते, विशेषत: मुंबईमध्ये.'
वेस्ट इंडिजविरुद्ध जयस्वालने 387 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारांसह 171 धावांची खेळी केली. त्याने रोहित शर्माबरोबर 229 धावांची विक्रमी भागीदारीही केली. रोहितनेही 103 धावांची खेळी केली. त्यांच्या खेळीमुळे भारताने पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 150 धावांवर आणि दुसरा डाव 130 धावांवर संपुष्टात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.