Yashasvi Jaiswal: पहिलं शतक, ड्रेसिंग रुममध्ये कौतुक! भारावलेल्या जयस्वालचे रोहितला श्रेय
West Indies vs India, 1st Test Yashasvi Jaiswal talk about partnership with Rohit Sharma:
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. हा 21 वर्षीय जयस्वालचा पहिलाच कसोटी सामना असून त्याने शतक साजरे करत हा सामना खास बनवला आहे.
जयस्वालने या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात 215 चेंडूत त्याचे पहिले शतक झळकावले. तसेच त्याने हे शतक करताना कर्णधार रोहित शर्मा याच्याबरोबर द्विशतकी भागीदारीही केली. त्याच्यात आणि रोहित शर्मामध्ये 229 धावांची सलामीला विक्रमी भागीदारी केली. रोहित 103 धावांवर बाद झाल्यानंतर त्यांची भागीदारी तुटली.
दरम्यान, रोहितनंतर शुभमन गिलही ६ धावांवर स्वस्तात बाद झाला. पण जयस्वालने या विकेट्सचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होऊन दिला नाही. त्याने नंतर विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाखेर जयस्वाल 143 धावांवर नाबाद राहिला, तर विराट 36 धावांवर नाबाद राहिला.
ड्रेसिंग रुममध्ये जोरदार स्वागत
पहिले आंतरराष्ट्रीय शतक केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर त्याचे भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफकडून कौतुक करण्यात आले. या कौतुकाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
याच व्हिडिओमध्ये जयस्वाल रोहितबरोबरील भागीदारीबद्दलही बोलला आहे, तसेच त्याने रोहितने त्याला सामन्यापूर्वी दिलेल्या विश्वासाबद्दलही सांगितले.
जयस्वाल भावूक
दरम्यान, शतकानंतर जयस्वाल भावूकही झाला होता. त्याने त्याचे हे शतक त्याच्या आई वडिलांना समर्पित केले आहे. तो म्हणाला, 'मी माझ्या आई-वडिलांना हे शतक समर्पित करू इच्छितो, कारण त्यांचेही मोठे योगदान माझ्या कारकिर्दीत राहिले आहे.' याशिवाय त्याने त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभार मानले.
भारताची पकड मजबूत
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा पहिला डाव 64.3 षटकात 150 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 113 षटकात 2 बाद 312 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने 162 धावांची आघाडी घेतली आहे.