Yashasvi Jaiswal expressed happiness about his double century during India vs England, 2nd Test Cricket:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला शुक्रवारपासून चालू झाला आहे. या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने द्विशतक करत सर्वांचे लक्ष वेधले.
त्याने भारताकडून 290 चेंडूत 209 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 7 षटकार मारले. हे जयस्वालचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच द्विशतक आहे. त्याने या द्विशतकाबद्दल आनंद व्यक्त केला असून त्याच्या खास सेलिब्रेशनमागील कारणही सांगितले आहे.
या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जयस्वालने त्याच्या पहिल्या वहिल्या द्विशतकाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जयस्वाल म्हणाला, 'मी प्रत्येक चेंडूचा आनंद घेतला. मैदानात जाऊन स्वत:ला व्यक्त करणे, कधीही चांगले असते. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण मी खूप आनंद घेतला, मी खूश आहे.'
त्याचबरोबर त्याच्या या खेळीदरम्यान असलेल्या मानसिकतेबद्दल तो म्हणाला, 'मी १०० टक्के मोठी खेळी करण्याचा विचार करत होतो. मी जेव्हा द्विशतकापर्यंत पोहचलो, तेव्हा मला तो क्षण साजरा करायचा होता आणि त्याचा आनंद घ्यायचा होता.'
जयस्वालने डावाच्या 102 व्या षटकात शोएब बशीरविरुद्ध पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार ठोकत त्याच्या द्विशतकाला गवसणी घातली होती. यावेळी त्याने हवेत उडी घेत आणि हेल्मेट व बॅट उंचावत जोशपूर्ण सेलिब्रेशन केले होते.
तसेच त्याने नंतर बॅट आणि हेल्मेट खाली ठेवत प्रेक्षकांकडे पाहून दोन्ही हातांनी फ्लाईंग किस दिले होते. त्याच्या या सेलिब्रेशनबद्दल त्याने सांगितले 'मी तसे केले, कारण ते किसेस माझ्या सर्व जवळच्या आणि प्रेमाच्या लोकांसाठी होते.'
त्याचबरोबर सचिन तेंडुलकरनेही ट्वीट करत जयस्वालच्या त्याच्या खेळीबद्दल कौतुक केले होते. याबद्दल जयस्वाल म्हणाला, 'सर (तेंडुलकर) तुमच्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी खूप आभार. मी आणखी प्रयत्न करत राहिल आणि शिकत राहिल.'
दरम्यान, जयस्वाल हा भारताकडून कसोटीत द्विशतक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळी आणि सुनील गावसकर यांनी वयाच्या 21 व्या वर्षीय कसोटीत द्विशतक केले होते.
विशाखापट्टणम कसोटीत जयस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबात 396 धावा केल्या. तसेच नंतर जसप्रीत बुमराहने 6 विकेट्स घेत गोलंदाजीत दाखवलेल्या शानदार प्रदर्शनामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 253 धावांत सर्वबाद करण्यात भारताला यश मिळाले. त्यामुळे भारताला 143 धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, दुसऱ्या डावात मात्र जयस्वालला मोठी खेळी करता आली नाही. तो या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 17 धावांवर बाद झाला. त्याला या सामन्यात दोन्ही डावात जेम्स अँडरसनने बाद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.