IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध 6 विकेट्स घेणाऱ्या बुमराहचा नवा विक्रम! ही कामगिरी करणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज

Jasprit Bumrah record: जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच डावात 6 विकेट्स घेत नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahAFP

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, Jasprit Bumrah 150 Test Wickets:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाखेर 171 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, भारताकडून दुसरा दिवस जसप्रीत बुमराहने गाजवला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 396 धावांवर संपल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला. इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. मात्र 114 धावांवर झॅक क्रावलीच्या रुपात इंग्लंडने दुसरी विकेट गमावल्यानंतर मात्र नियमित अंतरावर विकेट्स गमावल्या.

बुमराहने केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांना फारवेळ तग धरता आला नाही आणि त्यामुळे 6 फलंदाज बुमराहच्या जाळ्यात अडकून बाद झाले. बुमराहने पहिल्या डावात गोलंदाजी करताना 15.5 षटकात 45 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने त्याच्या कारकिर्दीत 150 कसोटी विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah: जेव्हा अश्विनच्या समोरच बुमराह करतो गोलंदाजीची नक्कल, पाहा Video

बुमराहने 34 व्या सामन्यात खेळताना 150 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. त्यामुळे तो भारताकडून सर्वात कमी सामन्यात 150 कसोटी विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. कपील देव यांनी 39 कसोटी सामन्यात 150 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच बुमराह सर्वात कमी सामन्यात 150 कसोटी विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा आशियाई वेगवान गोलंदाज देखील आहे. त्याच्यापुढे पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस आहे. त्यांनी 27 कसोटी सामन्यात 150 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या.

बुमराहच्या पुढे भारतीय फिरकीपटू

दरम्यान, बुमराह सर्वात कमी सामन्यात 150 कसोटी विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला असला, तरी भारताकडून त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्याइतक्या सामन्यात चार गोलंदाजांनी 150 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. पण चारही गोलंदाज फिरकीपटू आहेत.

भारताकडून सर्वात कमी सामन्यात 150 विकेट्स घेण्याचा विक्रम आर अश्विनच्या नावावर आहे. त्याने 29 सामन्यांत 150 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्यापाठोपाठ रविंद्र जडेजा असून त्याने 32 सामन्यात हा पराक्रम केला आहे, तर इरापल्ली प्रसन्ना आणि अनिल कुंबळे यांनीही बुमराह प्रमाणे 34 कसोटीत 150 विकेट्स घेतल्या होत्या.

Jasprit Bumrah
IND vs ENG: ...सिक्स, फोर अन् जयस्वालचं खणखणीत द्विशतक, टीममेट्सकडूनही खास कौतुक, पाहा Video

बुमराहचे विक्रम -

सर्वात कमी सामन्यांत 150 कसोटी विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज

  • 34 सामने - जसप्रीत बुमराह

  • 39 सामने - कपिल देव

  • 40 सामने - जवागल श्रीनाथ

  • 42 सामने - मोहम्मद शमी

  • 49 सामने - झहीर खान

सर्वात कमी सामन्यांत 150 कसोटी विकेट्स घेणारे आशियाई वेगवान गोलंदाज

  • 27 सामने - वकार युनूस

  • 34 सामने - जसप्रीत बुमराह

  • 37 सामने - इम्रान खान

  • 37 सामने - शोएब अख्तर

सर्वात कमी सामन्यांत 150 कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज (वेगवान आणि फिरकीपटू)

  • 29 सामने - आर अश्विन

  • 32 सामने - रविंद्र जडेजा

  • 34 सामने - इरापल्ली प्रसन्ना

  • 34 सामने - जसप्रीत बुमराह

  • 34 सामने - अनिल कुंबळे

  • 35 सामने - हरभजन सिंग

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com