

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2027 च्या अंतिम सामन्याची तारीख आणि स्थळ जाहीर केले आहे. 9 ते 13 जून 2027 या कालावधीत हा प्रतिष्ठेचा अंतिम सामना इंग्लंडमधील 'द ओव्हल' मैदानावर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, WTC फायनलचे आयोजन सलग चौथ्यांदा इंग्लंडमध्ये होत असून, 'द ओव्हल'ला प्रथमच अंतिम सामन्याचे यजमानपद मिळाले आहे.
यापूर्वी 2025 चा WTC अंतिम सामना लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात आला होता. त्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले होते. आता 2027 च्या अंतिम फेरीसाठी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे.
WTC अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणाऱ्या दोन संघांची निवड गुणतालिकेतील क्रमवारीनुसार केली जाते. स्पर्धेच्या अखेरीस सर्वाधिक गुण आणि सर्वोत्तम 'पर्सेंटेज ऑफ पॉइंट्स' (PCT) असलेले अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवतात.
भारतीय संघाने 2021 आणि 2023 मध्ये WTC फायनल गाठली होती. मात्र 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडकडून, तर 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
सध्याच्या गुणतालिकेनुसार ऑस्ट्रेलिया 84 गुण आणि 87.50 PCT सह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 36 गुण आणि 75 PCT सह दुसऱ्या क्रमांकावर असून न्यूझीलंड 52 गुण आणि 72.22 PCT सह तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश 28 गुणांसह चौथ्या, तर भारत 52 गुण आणि 48.15 PCT सह पाचव्या स्थानावर आहे. आगामी मालिकांतील कामगिरीवर अंतिम फेरीचे समीकरण अवलंबून असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.