WPL 2023 MI vs DC Final: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (26 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात रंगणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे.
दरम्यान, या सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यादरम्यान ऑरेंज कॅपही प्रदान केली जाईल. आयपीएल प्रमाणेच डब्ल्यूपीएलमध्येही सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाणार आहे. यंदाच्या हंगामात ही ऑरेंज कॅप पटकावण्यासाठी तीन खेळाडूंमध्ये चांगलीच चूरस पाहायला मिळणार आहे.
या तीन खेळाडू म्हणजे दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लेनिंग आणि मुंबई इंडियन्सची नतालिया स्किव्हर-ब्रंट व हेली मॅथ्यूज. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत लेनिंग आघाडीवर आहे. तिने आत्तापर्यंत या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिने 8 सामन्यात 51.66 च्या सरारीने 310 धावा केल्या आहेत.
या यादीत तिच्या पाठोपाठ युपी वॉरियर्सकडून खेळणारी ताहलिया मॅकग्रा आहे. तिने 9 सामन्यात 302 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर नतालिया असून तिने 9 सामन्यांत 54.40 च्या सरासरीने 272 धावा केल्या आहेत.
तसेच हेली मॅथ्यूज या यादीत पाचव्या क्रमांकावर असून तिने 9 सामन्यांत 32.25 च्या सरासरीने 258 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सोफी डिवाईनने 266 धावा केल्या आहेत.
पण या यादीतील ताहलिया मॅकग्रा आणि सोफी डिवाईन यांच्या संघांचे आव्हान संपूष्टात आल्याने त्यांची ऑरेंज कॅप पटकावण्याची संधीही संपली आहे.
पण आता नतालिया आणि मॅथ्यूजला लेनिंगला मागे टाकत ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी असेल, तर लेंनिंगही अंतिम सामन्यात आपला अफलातून फॉर्म कायम ठेवत ऑरेंज कॅपही स्वत:कडेच कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे अंतिम सामन्यानंतर ही ऑरेंज कॅप अखेर कोणाकडे जाणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
310 - मेग लेनिंग (8 सामने) (दिल्ली कॅपिटल्स)
302 - ताहलिया मॅकग्रा (9 सामने) (युपी वॉरियर्स)
272 - नतालिया स्किव्हर-ब्रंट (9 सामने) (मुंबई इंडियन्स)
266 - सोफी डिवाईन (8 सामने) (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
258 - हेली मॅथ्यूज (9 सामने) (मुंबई इंडियन्स)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.