WPL 2023 मध्ये पहिली हॅट्रिक घेणारी Issy Wong इंग्लंडकडूनही खेळलीये तिन्ही फॉरमॅट, पाहा आकडेवारी

WPL मध्ये हॅट्रिक घेत इतिहास रचणाऱ्या वाँगने वयाच्या 20 व्या वर्षाच्या आतच इंग्लंडचे तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
Issy Wong
Issy WongDainik Gomantak

Issy Wong Hat-Trick: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत एलिमिनेटरचा सामना युपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 72 धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. याच सामन्यात इजी वाँगने हॅट्रिक घेण्याचीही कमाल केली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने युपी वॉरियर्स समोर 183 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना युपीचा संघ 17.4 षटकात 110 धावांवर सर्वबाद झाला. युपीला रोखण्यात मुंबईच्या इजी वाँगने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने 13 व्या षटकात हॅट्रिक घेतल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामना मुंबईच्या बाजूने झुकवला.

या सामन्यात युपीने आधीच सुरुवातीच्या विकेट्स झटपट गमावल्या होत्या. त्यातच 13 व्या षटकात इजी वाँगने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट्स घेतल्या. तिने दुसऱ्या चेंडूवर 27 चेंडूत 43 धावा करणाऱ्या किरण नवगिरेला बाद केले.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सिमरन शेखला आणि चौथ्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनला तिने त्रिफळाचीत केले. याबरोबरच तिन हॅट्रिक साजरी केली. वाँग डब्ल्यूपीएलमध्ये हॅट्रिक घेणारी पहिलीच खेळाडू ठरली. वाँगने हॅट्रिक घेण्यापूर्वी डावाच्या 8 व्या षटकात युपीची कर्णधार एलिसा हेलीला 11 धावांवर बाद केले होते.

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या वाँगने या संपूर्ण हंगामातच चांगली कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत 9 सामने खेळले असून 12 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 61 धावा केल्या आहेत. ती डब्ल्यूपीएल 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तिला मुंबईने या हंगामासाठी 30 लाख रुपयांना खरेदी केले होते.

इंग्लंडकडून खेळते आंतरराष्ट्रीय क्रिकेट

20 वर्षीय वाँग इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. तिने आत्तापर्यंत इंग्लंडचे कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. तिने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका महिला संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान तिन्ही क्रिकेट प्रकारात इंग्लंडकडून पदार्पण केले होते. महत्त्वाचे म्हणजे तिचे आंतरराष्ट्रीय पदार्पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून झाले.

मध्यमगती गोलंदाज असलेल्या वाँगने आत्तापर्यंत 1 कसोटी सामना, 3 वनडे सामने आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने इंग्लंड महिला संघाकडून खेळले आहेत. तिने कसोटीत 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडेत 4 आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com