Virat Kohli-Steve Smith can break Ricky Ponting and Sunil Gavaskar record: लंडनमधील द ओव्हल मैदानावर 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथवर सर्वांचीच नजर असणार आहे.
या सामन्यादरम्यान, या दोघांमध्ये एका विक्रमासाठी शर्यतही असणार आहे. या दोघांचीही नजर सुनील गावसकर आणि रिकी पाँटिंग यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मागे टाकण्याकडे असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सध्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 कसोटी सामने खेळताना 74 डावात 11 शतके केली आहेत.
त्याच्यापाठोपाठ गावसकर, पाँटिंग, विराट आणि स्मिथ हे चौघेही प्रत्येकी 8 शतकांसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
गावसकरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 कसोटी सामन्यांमधील 31 डावात 8 शतके केली आहेत, पाँटिंगने भारताविरुद्ध 29 कसोटी सामन्यांमधील 51 डावात 8 शतके केली आहेत. त्याचबरोबर विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 कसोटी सामन्यांमधील 42 डावात 8 शतके झळकावली आहेत, तर स्मिथने भारताविरुद्ध 18 कसोटी सामन्यांमधील 35 डावात खेळताना 8 शतके झळकावली आहेत.
दरम्यान, द ओव्हलवर होणाऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत एकमेकांना मागे टाकण्यासाठी विराट आणि चेतेश्वर पुजारा यांच्यातही शर्यत राहणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्याच नावावर आहे. त्याने 39 सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 3630 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्यापाठोपाठ व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड आहेत. लक्ष्मणने 29 सामन्यांमध्ये 49.67 च्या सरासरीने 2434 धावा केल्या आहेत.
तसेच द्रविडने 32 सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीने 2143 धावा केल्या आहेत. यानंतर चौथ्या क्रमांकावर पुजारा आणि पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 सामन्यांमध्ये 50/82 च्या सरासरीने 2033 धावा केल्या आहेत. तसेच विराटने 24 सामन्यांमध्ये 48.26 च्या सरासरीने 1979 धावा केल्या आहेत.
त्यामुळे विराट आणि पुजारा यांच्यात केवळ 54 धावांचा फरक आहे. तसेच या विक्रमाच्या यादीत राहुल द्रविडला माग टाकण्याची पुजारा आणि विराटला संधी आहे. द्रविडला मागे टाकण्यासाठी पुजाराला 111 धावांची गरज आहे, तर विराटला 165 धावांची गरज आहे. त्यामुळे या यादीत हे दोघे द्रविडला मागे टाकणार का, हे देखील पाहावे लागणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.