Virat Kohli shares Social Media post with Rahul Dravid ahead of Dominica Test against West Indies:
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, टी20 आणि वनडे अशा तिन्ही क्रिकेट प्रकारातील मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. 12 जुलैपासून या दौऱ्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होईल. तत्पूर्वी विराट कोहलीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोशल मीडियावर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमागील कारणही त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की 'साल 2011 मध्ये डॉमिनिकाला आम्ही खेळलेल्या अखेरच्या कसोटीतील केवळ दोन खेळाडू. कधीही कल्पना केली नव्हती की या प्रवासात आम्ही वेगवेगळ्या भूमिकेत येथे परत येऊ. खूपच कृतज्ञ आहे.'
खरंतर सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना डॉमिनिकामधील रोसौ येथी विंडसर पार्कमध्ये खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ डॉमिनिकाला पोहचला आहे.
यापूर्वी भारताने याच ठिकाणी म्हणजे डॉमिनिकाला अखेरचा कसोटी सामना 2011 मध्ये 6 ते 10 जुलै दरम्यान खेळला होता.
दरम्यान, 2011 ला डॉमनिकाला झालेल्या कसोटी सामन्यात भारताकडून खेळलेले विराट आणि द्रविड हे दोनच खेळाडू सध्याच्या भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे भाग आहेत. याच गोष्टीची आठवण विराटने करून दिली आहे.
भारताने 2011 मध्ये केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना डॉमनिकाला खेळला होता. याच मालिकेतून विराटने भारतासाठी कसोटी पदार्पण केले होते. त्यामुळे त्याचा हा कारकिर्दीतील तिसरा कसोटी सामना होता. त्यावेळी भारतीय संघाचा राहुल द्रविड खेळाडू म्हणून भाग होता.
अनिर्णित राहिलेल्या त्या सामन्यात विराटने पहिल्या डावात 30 धावांची खेळी केलेली. दुसऱ्या डावात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच द्रविडने पहिल्या डावात 5 धावा केलेल्या, तर दुसऱ्या डावात तो 34 धावांवर नाबाद होता.
त्या मालिकेनंतर विराट अद्यापही 12 वर्षे भारतीय संघाकडून कसोटी खेळत आहे, तर द्रविड आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.