Asia Cup 2023, India vs Pakistan, Virat Kohli:
भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर कपच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी (11 सप्टेंबर) 228 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीला शतकी खेळी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्याने त्याच्या खेळाबद्दल मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, विराटने पुन्हा भारताला मंगळवारी मैदानात उतरावे लागणार असल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले आहे की तो कसोटीतही खेळत असल्याने त्याचा फायदा होणार आहे.
खरंतर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरचा सामना रविवारी सुरू झाला होता. मात्र, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव सुरू असताना 24.1 षटकांच्या खेळानंतर पावसामुळे सामना थांबला. त्यामुळे उर्वरित सामना सोमवारी राखीव दिवशी पूर्ण करण्यात आला.
मात्र, वेळापत्रकाप्रमाणे भारतीय संघाला आशिया चषकातील सुपर फोर फेरीतील दुसरा सामना मंगळवारी (12 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्येच खेळायचा आहे. खरंतर स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्यात आले, त्यावेळी केवळ अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता.
मात्र, सुपर फोर फेरी चालू झाल्यानंतर कोलंबोमधील पावसाचा अंदाज लक्षात घेता अचानक भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच निर्णयामुळे आता भारताला सलग तिसऱ्या दिवशी मैदानात उतरावे लागणार आहे.
विशेष म्हणजे रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना थांबला तेव्हाही विराट फलंदाजी करत होता. तसेच सोमवारीही त्याने फलंदाजी करत शतकही साजरे केले. आता त्याला मंगळवारीही श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
याबद्दल विराट पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला, 'मी धावा काढत होतो आणि त्याबद्दल आनंदीही आहे. पण मी हा विचारही केला की मला परत उद्या दुपारी ३ वाजता सामना खेळायचा आहे. नशीब आम्ही कसोटी खेळणारे खेळाडू आहोत, मी १०० पेक्षा जास्त कसोटी खेळलो आहे, त्यामुळे मला माहित आहे की कसे पुनरागमन करायचे आणि दुसऱ्या दिवशी खेळायचे.
तसेच पुढे हसून विराट म्हणाला, 'बाहेर सध्या खूप दमट वातावरण आहे, मी नोव्हेंबरमध्ये ३५ वर्षांचा होईल, त्यामुळे मला माझ्या रिकव्हरीचीही काळजी घ्यावी लागणार आहे.'
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराटने 94 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 122 धावांची नाबाद खेळी केली. तसेच ही खेळी करताना केएल राहुलबरोबर विक्रमी २३३ धावांची भागीदारी केली. केएल राहुलने १११ धावांनी नाबाद खेळी केली. त्यामुळे भारताने ५० षटकात २ बाद ३५६ धावा उभारल्या होत्या.
या खेळीबद्दल विराट म्हणाला, 'मी संघाला मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो. आज केएल राहुलला चांगली सुरुवात मिळाली होती आणि मी स्ट्राईक रोटेट करण्याचे काम केले. मी काही सोप्या धावा घेण्याचा, दोन धावा धावण्याचा प्रयत्न केला.'
तसेच वेगवान गोलंदाजाविरुद्ध अखेरच्या षटकात रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला, ज्यावर भारताला चौकार मिळाला.
याबद्दल विराट म्हणाला, 'मी तो शॉट खेळला, कारण माझे शतक झाले होते. त्या शॉटबद्दल मला आदर आहे. मी तसे शॉट्स खेळत नाही, मी ते शॉट खेळताना खूप वाईट दिसतो.'
'मी आणि केएल दोघेही पारंपारिक खेळ करणारे खेळाडू आहोत, आम्हा फँन्सी शॉट्स फार मारता येत नाही, त्याऐवजी आम्ही क्रिकेटिंग शॉट्स खेळतो. आमची चांगली भागीदारी झाली, भारतीय संघासाठी हे चांगले संकेत आहेत. त्याने ज्याप्रकारे वनडेत पुनरागमन केले, त्यासाठी आनंदी आहे.'
याशिवाय विराटने ग्राऊड्समनचेही त्यांनी पावसाच्या वत्ययानंतरही सामना होण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले.
दरम्यान, 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 32 षटकात 8 बाद 128 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त असताना सामना तिथेच थांबवण्यात आला. त्यामुळे भारताने विजय मिळवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.