ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka, Virat Kohli Record:
भारत विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (2 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अर्धशतक करत मोठे विक्रम केले आहेत.
विराटने 94 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावांची खेळी केली. हे त्याचे 70 वे वनडे शतक ठरले. मात्र त्याचे वनडे क्रिकेटमधील 49 वे शतक करण्याची संधी अगदी थोडक्यात 12 धावांनी हुकली.
जर विराटने 49 वनडे शतक पूर्ण केले असते, तर त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील सर्वाधिक 49 शतकांची बरोबरी केली असती. विशेष म्हणजे सचिन मैदानावर सामना पाहण्यासाठी उपस्थित असताना त्याला ही संधी होती. मात्र, त्याची ही संधी थोडक्यात हुकली.
विराटची ही संधी हुकली असली तरी विराटने काही विक्रम केले आहेत. विराटने वनडे वर्ल्डकपमध्ये ५० धावांचा टप्पा पार करण्याची ही १३ वी वेळ होती.
त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने 21 वेळा वनडेत 50 धावांपेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 50+ धावांची खेळी करणारे क्रिकेटपटू (आकडेवारी 2 नोव्हेंबर 2023 पर्यंत) -
21 वेळा - सचिन तेंडुलकर (44 डाव)
13 वेळा - विराट कोहली (33 डाव)
12 वेळा - रोहित शर्मा (24 डाव)
12 वेळा - शाकिब अल हसन (35 डाव)
12 वेळा - कुमार संगकारा (35 डाव)
11 वेळा - रिकी पाँटिंग (42 डाव)
विराटने या खेळीदरम्यान 2023 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे त्याने एका वर्षात वनडेत 1000 धावा पूर्ण करण्याची ही आठवी वेळ ठरली.
त्यामुळे तो 8 वेळा एका वर्षात 1000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने याबाबत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने 7 वेळा वनडेत एका वर्षात 1000 धावांचा टप्पा पार केला होता.
विराटने 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019 आणि 2023 असे आठ वर्षी वनडेत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
विराटने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पूर्ण केला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध आता 72 सामन्यात 4018 धावा झाल्या आहेत. तो श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे.
सचिनने श्रीलंकेविरुद्ध 109 सामन्यात 5108 धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा इंझमाम-उल-हक आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 83 सामन्यात 3824 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.