Vijay Hazare Trophy: स्नेहल, सुयशची शतके, अर्जुन तेंडुलकरचे चार बळी; गोव्याचा नागालँड विरोधात सर्वात मोठा विजय

दुबळ्या नागालँडला तब्बल २३२ धावांनी हरविले.
Vijay Hazare Trophy
Vijay Hazare Trophy
Published on
Updated on

Vijay Hazare Trophy: विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील धावांच्या फरकाने आपला सर्वात मोठा विजय गोव्याने शुक्रवारी नोंदविला.

स्नेहल कवठणकर व सुयश प्रभुदेसाई यांची शतके, तसेच अर्जुन तेंडुलकरच्या चार विकेट या बळावर त्यांनी दुबळ्या नागालँडला तब्बल २३२ धावांनी हरविले. ठाणे-महाराष्ट्र येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सामना झाला.

स्पर्धेच्या ‘ई’ गटात सलग तीन सामने गमावल्यानंतर गोव्याचा हा पहिलाच विजय ठरला. लिस्ट ए क्रिकेटमधील चौथे शतक केलेला २८ वर्षीय स्नेहल कवठणकर (११४) व पहिलेच शतक नोंदविलेला २५ वर्षीय सुयश प्रभुदेसाई (नाबाद १३२) यांनी गोव्याला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर ६ बाद ३८३ धावांचा टप्पा गाठून दिला.

त्यानंतर कर्णधार रोंगसेन जोनाथन (५५) याच्या अर्धशतकामुळे नागालँडला १५१ धावांची मजल मारता आली. २००९-२०१० मोसमात चेन्नई येथे केरळविरुद्ध १२४ धावांनी नोंदविलेला विजय गोव्याचा यापूर्वीचा सर्वांत मोठा होता.

Vijay Hazare Trophy
Goa Accident: सेरावली-वेर्णा येथे दुचाकीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू, तर तेरेखोल नदीत कोसळली कार

गोव्याला स्नेहल कवठणकर व ईशान गडेकर (५४) यांनी १३० चेंडूंत ११३ धावांची सलामी दिली. मात्र नंतर स्नेहल व सुयश प्रभुदेसाई यांनी आक्रमक फलंदाजी करत दुसऱ्या विकेटसाठी १२१ चेंडूंत १५९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करता आली.

स्नेहलने ११८ चेंडूंत १० चौकार व १ षटकार लगावला. आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने संघात कायम ठेवलेल्या सुयशने टी-२० क्रिकेटला साजेशी फलंदाजी करताना ८१ चेंडूंतील खेळीत ९ चौकार व ६ षटकार मारले. अर्जुन तेंडुलकर, लक्षय गर्ग, विजेश प्रभुदेसाई हे मध्यमगती आणि फिरकी दर्शन मिसाळ यांनी नागालँडचे ५ बाद ४० अशी दयनीय स्थिती केल्यानंतर त्यांना ३८४ धावा महाकाय ठरल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ५० षटकांत ६ बाद ३८३ (ईशान गडेकर ५४, स्नेहल कवठणकर ११४, सुयश प्रभुदेसाई नाबाद १३२, दर्शन मिसाळ १६, राहुल त्रिपाठी ३६, के. व्ही. सिद्धार्थ ०, दीपराज गावकर १३, मोहित रेडकर नाबाद १, नागाहो खिशी ७३--२, चोपिसे होपोंगक्यू ६८-३)

वि. वि. नागालँड ः ३९.१ षटकांत सर्वबाद १५१ (रोंगसेन जोनाथन ५५, आर. एस. जगन्नाथ सिनिवास २१, ताहमीद रेहमान १४, अर्जुन तेंडुलकर १०-१-३०-४, लक्षय गर्ग ६-०-१६-१, विजेश प्रभुदेसाई ३-०-१७-१, दर्शन मिसाळ ७-१-२३-२, मोहित रेडकर १०-१-४५-१, दीपराज गावकर ३-०-१५-०, सुयश प्रभुदेसाई ०.१-०-१-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com