

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणारे २०१८ मधील सॅण्डपेपरगेट प्रकरण तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा याने आपल्या आत्मचरित्रातून या प्रकरणाबाबत काही धक्कादायक दावे केले आहेत. केपटाऊन कसोटी सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रकाराची माहिती ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडूंना होती, असा दावा ख्वाजाने केला आहे. त्याच्या या विधानामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कर्णधार पॅट कमिन्स याने ख्वाजाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे सांगत कमिन्सने आपली नाराजी व्यक्त केली.
२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडूचा आकार बदलण्यासाठी सँडपेपरचा वापर केल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे जागतिक क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब झाली होती. आता आठ वर्षांनंतर उस्मान ख्वाजाने आपल्या आत्मचरित्रातून या घटनेविषयी केलेल्या दाव्यांमुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणी आणि वाद समोर आले आहेत.
उस्मान ख्वाजाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पॅट कमिन्सने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. संपूर्ण संघाला सँडपेपरच्या वापराबाबत माहिती होती, हा दावा चुकीचा असल्याचे त्याने सांगितले. कमिन्सच्या मते, मैदानावर चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपर आणला जाणार आहे, याची त्याला कोणतीही कल्पना नव्हती.
गेल्या आठ वर्षांपासून आपण हीच भूमिका मांडत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. या प्रकरणाचे नियोजन कमिन्ससह अन्य खेळाडूंनी मिळून केले होते, असा दावा करण्यात आला असेल तर तोही पूर्णपणे निराधार असल्याचे त्याने म्हटले. पत्रकार परिषदेत बोलताना कमिन्सने ख्वाजाचे आरोप 'पूर्णपणे बकवास' असल्याचे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणात ख्वाजाने घेतलेल्या भूमिकेमुळे आपल्याला आश्चर्य वाटल्याचे कमिन्सने सांगितले. विशेषतः कॅमेरून बॅनक्रॉफ्ट सँडपेपर वापरत असताना त्याने सावधगिरी बाळगावी, असे ख्वाजाने सांगितल्याच्या दाव्यामुळे कमिन्सला धक्का बसला. ख्वाजा हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील सकारात्मक बदलांचा भाग राहिला आहे.
गेल्या काही वर्षांत संघाची संस्कृती सुधारण्यासाठी त्यानेही योगदान दिले आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशा प्रकारची विधाने अपेक्षित नव्हती, असे कमिन्सने नमूद केले. ख्वाजा आपला मित्र राहिला आहे; मात्र अशा आरोपांमुळे अनेकांच्या आयुष्यावर आणि प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो, अशी नाराजीही त्याने व्यक्त केली.
२०१८ मध्ये सॅण्डपेपरगेटची घटना घडली, तेव्हा कमिन्स अवघ्या २४ वर्षांचा होता. या प्रकरणात आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असे त्याने पुन्हा एकदा ठामपणे सांगितले. मैदानावर सँडपेपर आणला जाणार आहे किंवा त्याचा वापर होणार आहे, याची माहिती आपल्याला नव्हती, असे कमिन्सने स्पष्ट केले.
पत्रकाराने या प्रकरणात कोणाची बाजू खरी आहे, असा प्रश्न विचारला असता कमिन्सने ही आपली बाजू असल्याचे सांगत ख्वाजाचे दावे चुकीचे असल्याचे म्हटले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटने आपल्याला खूप काही दिले आहे. त्यामुळे संघाची प्रतिमा आणि खेळाडूंची प्रतिष्ठा यांना धक्का पोहोचेल, अशा बेजबाबदार विधानांमुळे आपण नाराज असल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यामुळे ख्वाजा आणि कमिन्स यांच्यातील या विधानांमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील आठ वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.