Girls Safety In Goa: सुरक्षित गोव्याची ओळख धोक्यात

Goa minor girls sexual assault cases: गोवा हे शांत, सुरक्षित आणि निवांत जीवनशैलीसाठी ओळखले जाणारे राज्य. मात्र, अलीकडच्या काळात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे या ओळखीला धक्का बसत आहे.
Girls Safety In Goa
Girls Safety In GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मृणाली राऊत

गोवा हे शांत, सुरक्षित आणि निवांत जीवनशैलीसाठी ओळखले जाणारे राज्य. मात्र, अलीकडच्या काळात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे या ओळखीला धक्का बसत आहे. अवघ्या चार दिवसांत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण गोवा हादरला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही घटना अवघ्या चार दिवसांच्या अंतरात आणि गोव्यातील वेगवेगळ्या भागांत घडल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकेकाळी अशा प्रकारच्या घटना ऐकल्यानंतर किमान गोव्यात तरी मुली सुरक्षित आहेत, असा विश्वास वाटायचा. मात्र, आता या घटना समोर आल्यानंतर तो विश्वास डळमळीत होत आहे. गोव्यातील मुली आणि महिला खरोखरच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

गोवा हे पर्यटनस्थळ आहे. देश-विदेशातून हजारो पर्यटक येथे येतात. गोव्याचे निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक येथे येतात. मात्र, याच गोव्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. अनेकदा पर्यटकांकडून गोव्यातील गैरप्रकारांबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या जातात. काही वेळा अशा माध्यमांतून प्रशासनाचे लक्षही वेधले जाते. पण जेव्हा राज्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्न निर्माण होतात, तेव्हा परिस्थिती किती गंभीर आहे, याचा विचार करण्याची गरज आहे.

Girls Safety In Goa
Goa Smart Electricity Meters: 'स्‍मार्ट मीटर' रद्द करा, अन्यथा आंदोलन; अमित पाटकरांचा सरकारला इशारा, 15 दिवसांची दिली मुदत

दुसरीकडे, रोजगाराच्या शोधात देशाच्या विविध भागांतून अनेक स्थलांतरित कामगार गोव्यात येतात. त्यापैकी काही व्यक्ती गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येतात. म्हापसा येथील घटनेतील पीडित चिमुकलीही स्थलांतरित कुटुंबातील होती. मात्र, ती स्थलांतरित आहे म्हणून तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे गांभीर्य कमी होत नाही. प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. गुन्हेगार कोणत्या राज्यातील किंवा कोणत्या पार्श्वभूमीतील आहे, यापेक्षा त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.

त्याचवेळी, गोव्यात येणाऱ्या स्थलांतरित कामगारांची योग्य नोंदणी, त्यांची पार्श्वभूमी तपासणी आणि भाडेकरूंची पडताळणी यांसारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. यासोबतच गोव्यातील अनेक बेवारस आणि निर्जन इमारतींचा प्रश्नही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्यात अशा अनेक इमारती आहेत, ज्या वर्षानुवर्षे वापराविना पडून आहेत.

काही इमारतींमध्ये अनधिकृतपणे लोक वास्तव्य करत असल्याचेही पाहायला मिळते. विशेष म्हणजे, अशा काही ठिकाणांची माहिती स्थानिक गोमंतकीयांपेक्षा बाहेरून गोव्यात आलेल्या व्यक्तींना अधिक असते. अनेकदा या इमारती आणि निर्जन जागांचा वापर गैरप्रकारांसाठी किंवा गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जाऊ शकतो. अशा जागा हळूहळू गुन्हेगारीसाठी सुरक्षित ठिकाणे बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Girls Safety In Goa
Goa Congress Alliance: 'आरजी'सह गोवा फॉरवर्डला सोबत घेण्‍यास काँग्रेस तयार! जागावाटपाच्‍या बैठकांना गुरूवारपासून सुरवात

शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात महिला स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. अनेक महिला रात्री उशिरापर्यंत काम करून घरी परततात. काही महिला नाईट शिफ्टमध्ये काम करतात, तर काहींना कामानिमित्त एकट्याने प्रवास करावा लागतो. अशा स्थितीत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि वाहतूक व्यवस्था सुरक्षित असणे ही केवळ अपेक्षा नसून प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी राज्यात पोलिसांची गस्त वाढवणे, संवेदनशील आणि निर्जन भागांमध्ये नियमित पेट्रोलिंग करणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी तक्रार यंत्रणा अधिक सक्षम करणे, तसेच गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.