Vaibhav Sooryavanshi Captain: वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला कर्णधार! क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Vaibhav Sooryavanshi Bihar Captain: भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशी याच्यावर आता आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Vaibhav Sooryavanshi Captain
Vaibhav Sooryavanshi CaptainDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या वैभव सूर्यवंशी याच्यावर आता आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अवघ्या १५व्या वर्षी या युवा फलंदाजाला बिहार क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. आगामी सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी बिहार क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली असून, वैभवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, इतक्या कमी वयात वरिष्ठ स्तरावरील महत्त्वाच्या देशांतर्गत स्पर्धेत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने वैभवच्या कारकिर्दीत आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची भर पडली आहे.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत वैभवकडे कर्णधारपद; सूरज कश्यप उपकर्णधार

सैयद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, ६ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील या महत्त्वाच्या टी-२० स्पर्धेत एकूण ३८ संघ सहभागी होतात. या स्पर्धेसाठी बिहार क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. वैभव सूर्यवंशीला कर्णधारपद देण्यात आले असून सूरज कश्यप याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

मात्र, बिहार क्रिकेट बोर्डाने सध्या स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठीच खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या संघात यष्टिरक्षक म्हणून आयुष लोहारुका आणि अनमोल कुमार यांचा समावेश आहे. याशिवाय आलोक कुमार, अल्तमश अशरफ, परम कुमार सिंह, रित्विक राज, मयंक कुमार, राघवेंद्र प्रताप, आशीष कुमार, वासुदेव प्रताप सिंह, मोहम्मद इजहार, अमोद यादव, प्रशांत सिंह, नवाज खान आणि हिमांशू सिंह यांनाही संधी मिळाली आहे.

Vaibhav Sooryavanshi Captain
Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

वैभवला मोठी जबाबदारी देण्याबाबत सचिन तेंडुलकरने व्यक्त केली होती चिंता

वैभव सूर्यवंशीला कमी वयात मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही वैभवला उपकर्णधारपद देण्याबाबत आपले मत व्यक्त केले होते. दुलीप ट्रॉफीमध्ये वैभवला उपकर्णधारपद देण्यात आले होते. या निर्णयाबाबत विचारले असता सचिनने इतक्या लहान वयात त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकणे योग्य नसल्याचे मत मांडले होते.

सचिनच्या मते, वैभवला आधी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अधिक सामने खेळण्याची संधी मिळायला हवी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवणे अधिक योग्य ठरेल. युवा खेळाडूच्या कौशल्याला वाव देतानाच त्याच्या अनुभवाचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता बिहार क्रिकेट बोर्डाने त्याच्याकडे थेट कर्णधारपद सोपवल्याने या निर्णयाकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Vaibhav Sooryavanshi Captain
Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

टी-२० स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार होण्याचा मान मिळणार?

वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी वैभवला मिळालेली ही संधी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या नियुक्तीमुळे सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात युवा कर्णधारांपैकी एक होण्याची संधी त्याला मिळणार आहे. तसेच, जगभरातील टी-२० स्पर्धांमध्येही इतक्या कमी वयात नेतृत्व करण्याची ही दुर्मीळ संधी ठरू शकते.

याआधी वैभवने दुलीप ट्रॉफीमध्येही नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रोएशियाच्या जॅक वुकुसिच याने वयाच्या १७ वर्षे ३११ दिवसांनी कर्णधारपद भूषवले होते. तर अफगाणिस्तानचा राशिद खान याने वयाच्या २० वर्षे ३५० दिवसांनी कसोटी संघाचे नेतृत्व केले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्येही राशिदने वयाच्या १९व्या वर्षी अफगाणिस्तानच्या संघाची धुरा सांभाळली होती.

आता वैभवला मिळालेल्या या नव्या संधीचे तो कसे सोने करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. फलंदाजीतील आक्रमक शैलीनंतर आता कर्णधार म्हणूनही तो आपली छाप पाडणार का, हे आगामी स्पर्धेत स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.