

पणजी: मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून, उद्या (शनिवारी) सकाळी १०.३० वाजता राजभवनवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू त्यांना मंत्रिपदाची शपथ देतील.
विधानसभा निवडणुकीला अवघे तीनच महिने शिल्लक असताना भाजपने मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. संकल्प आमोणकर हे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आठ आमदारांपैकी एक आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या या आठ आमदारांपैकी आतापर्यंत आलेक्स सिक्वेरा आणि दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. आता याच आठ आमदारांमधील संकल्प आमोणकर यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. फोंड्याचे तत्कालीन आमदार रवी नाईक हे कृषिमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे बारा सदस्यीय राज्य मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली होती. ती जागा कोणाला मिळणार, याविषयी तर्क-वितर्क व्यक्त केले जात होते.
मुरगाव तालुक्याला दुसरे मंत्रिपद : राजकीयदृष्ट्या वाढले महत्त्व
आमदार संकल्प आमोणकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे मुरगाव तालुक्याला दुसरे मंत्रिपद मिळणार आहे. दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो हे यापूर्वीच पंचायत मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे एकाच तालुक्यातील दोन आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरगाव तालुक्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे मुरगावातून आनंद व्यक्त होत आहे.
...अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय
१ रवी नाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला राजकीयदृष्ट्या बळ देण्याच्या दृष्टीने रितेश यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत काही महिन्यांसाठी मंत्रिपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संकल्प आमोणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
२ विशेष म्हणजे, फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने उर्वरित अल्प कालावधीत मंत्रिमंडळात नव्या सदस्याचा समावेश करण्याऐवजी रवी नाईक यांची रिक्त जागा तशीच ठेवली जाईल, अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, भाजपने प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय गोटातून तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
कोणते खाते मिळणार?
आमोणकर यांच्यावर कोणत्या खात्याची जबाबदारी सोपविली जाणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या उर्वरित कालावधीत त्यांना मंत्रिपदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळणार असून, भाजपने या निर्णयातून मुरगावमधील राजकीय प्रतिनिधित्वालाही महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.