

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली येत्या ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. मात्र, या भव्य स्पर्धेच्या सुरुवातीला काही दिवस शिल्लक असतानाच क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या (USA) क्रिकेट संघाचा महत्त्वाचा खेळाडू आरोन जोन्स याच्यावर मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या आरोपांची दखल घेत जोन्सला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून तत्काळ निलंबित केले आहे.
आयसीसीने २९ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आरोन जोन्सवर भ्रष्टाचाराचे एकूण पाच गंभीर आरोप आहेत. हे आरोप २०२३-२४ मध्ये बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या 'BIM10' टी-२० स्पर्धेशी संबंधित आहेत.
जोन्सने सामन्याचा निकाल किंवा खेळाच्या इतर पैलूंवर चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकण्याचा कट रचल्याचा संशय आहे. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन आयसीसीने त्याला बचावासाठी १४ दिवसांचा वेळ दिला असून, तोपर्यंत तो कोणत्याही क्रिकेट उपक्रमात सहभागी होऊ शकणार नाही.
२०२४ च्या टी-२० विश्वचषकात अमेरिकेला सुपर-८ पर्यंत पोहोचवण्यात आरोन जोन्सने मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, आता विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच त्याच्यावर झालेल्या या कारवाईमुळे अमेरिकन संघाची मोठी हानी झाली आहे.
अमेरिकेला आपला पहिला सामना ७ फेब्रुवारीला भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळायचा आहे. अशा वेळी संघातील सर्वात अनुभवी खेळाडूवर निलंबनाची ओढवलेली वेळ अमेरिकेच्या रणनीतीला खिंडार पाडणारी ठरू शकते.
विशेष म्हणजे, विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या बहुतांश देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत, परंतु अमेरिकेने अद्याप आपल्या अंतिम १५ खेळाडूंची घोषणा केलेली नाही. जोन्सवर झालेल्या या कारवाईमुळे आता अमेरिकन निवड समितीला नवीन खेळाडूचा विचार करावा लागणार आहे.
आरोन जोन्सने आतापर्यंत ४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७७० धावा केल्या आहेत. ७ फेब्रुवारीला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात आता अमेरिकेचा संघ जोन्सविना मैदानात उतरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.