पणजी: अग्रस्थानावरील संघास साजेसा धडाकेबाज खेळ करताना गुरुवारी मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत एफसी गोवाचा फडशा पाडला. स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना त्यांनी अखेरची अकरा मिनिटे दहा खेळाडूंसह खेळलेल्या प्रतिस्पर्ध्यावर 4-1 फरकाने सफाईदार विजय प्राप्त केला. सामना मुंबई फुटबॉल अरेनावर झाला.
(Mumbai City FC)
मुंबई सिटीने एकंदरीत सहाव्या, तर सलग चौथ्या विजयाची नोंद केली. अन्य तीन बरोबरीसह स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ हा मान आता मुंबई सिटीकडे कायम आहे. त्यांचे आता नऊ लढतीनंतर २१ गुण झाले असून दुसऱ्या स्थानावरील हैदराबाद एफसीवर पाच गुणांची आघाडी घेतली आहे. ७९व्या मिनिटास एफसी गोवाचा स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे बाकी कालावधीत गोव्याच्या संघाला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यांचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत चौथा पराभव ठरला. आठ लढतीनंतर त्यांचे १२ गुण कायम राहिले व सहाव्या स्थानी घसरण झाली.
मुंबई सिटीच्या विजयात अर्जेंटिनाचा होर्गे परेरा डायझ याने दोन गोल नोंदविले. त्याने अनुक्रमे १६व्या व ४८व्या मिनिटास गोल नोंदवून मुंबई सिटीची आघाडी भक्कम केली. याशिवाय लाल्लियानझुआला छांगटे याने ४२व्या, तर बदली खेळाडू स्पॅनिश आल्बर्टो नोगेरा याने ५५व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला. एफसी गोवाचा एकमात्र गोल स्पॅनिश इकेर ग्वार्रोचेना याने २२व्या मिनिटास नोंदविला.
सलग सात सामने वर्चस्व
मुंबई सिटीने एफसी गोवावर गुरुवारी पूर्ण वर्चस्व राखले. त्यातच एफसी गोवाच्या बचावफळीतील चुकांचे सत्र कायम राहिल्यामुळे यजमान संघाचे काम आणखीनच सोपे झाले. या कारणास्तव त्यांना सलग सात सामने गोव्यातील संघावर वर्चस्व राखता आले. २०२०-२१ पासून मुंबई सिटी संघ एफसी गोवाविरुद्ध हरलेला नाही. या कालावधीत त्यांनी ४ विजय व ३ बरोबरीची नोंद केली असून आता सलग ३ सामने जिंकले आहेत.
दृष्टिक्षेपात सामना...
मुंबई सिटीचे यंदाच्या आयएसएल स्पर्धेत आता 9 सामन्यांत सर्वाधिक २७ गोल
मुंबई सिटीचा होर्गे परेरा डायझ ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत आघाडीवर, 9 सामन्यांत 6 गोल
एफसी गोवाविरुद्ध 21 आयएसएल लढतीत मुंबई सिटीचे 8 विजय, एफसी गोवा 7 लढतीत विजयी, तर 6 बरोबरी
एफसी गोवाचे यंदा स्पर्धेतील 4 सामन्यात 3 पराभव व 1 विजय
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.