Goa Cricket Team Captian: पणजीः अष्टपैलू सुयश प्रभुदेसाई याची आगामी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी गोव्याच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत नेतृत्व केलेल्या स्नेहल कवठणकर याच्याजागी नव्या चेहऱ्यास संधी मिळाली, त्याचवेळी राज्याबाहेरील `स्थानिक` खेळाडूंनाही वगळण्यात आले.
सुयशने टी-20 स्पर्धेत पुदुचेरीविरुद्ध शेवटच्या सामन्यात गोव्याचे नेतृत्व केले होते, आता एकदिवसीय स्पर्धेसाठीही त्याच्याकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. टी-20 स्पर्धेतील सामन्यात वगळण्यात आल्यामुळे संघ सोडून दिल्लीस घरी रवाना झालेला आदित्य कौशिक याला डच्चू देण्यात आला आहे. दिल्लीचा, पण गोव्यातर्फे स्थानिक या नात्याने खेळणारा रणजीपटू अमित यादव आणि विश्वंबर काहलोन या राज्याबाहेरील खेळाडूंनाही संघात जागा देण्यात आलेली नाही. टी-20 संघातील अतिरिक्त खेळाडू मलिक शिरूर याचीही निवड झालेली नाही.
गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई निवड समितीचे निमंत्रक असून रणजी संघ निवड समितीचे अध्यक्ष गिरीश पारेख, सदस्य संजय धुरी आणि आनंद म्हापणकर, मुख्य प्रशिक्षक मन्सूर अली यांनी संघ निवडला.
संघात तिघे पाहुणे
मुंबईचा माजी कर्णधार सिद्धेश लाड, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि गोव्यातर्फे तिसरा मोसम खेळणारा एकनाथ केरकर हे संघातील पाहुणे क्रिकेटपटू आहेत. तिघेही मुंबईचे आहेत. सिद्धेशकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
आंध्रविरुद्ध पहिला सामना
बंगळूर येथे 12 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. तिघा खेळाडूंचा अपवाद बाकी संघ टी-20 स्पर्धेसाठी निवडलेला आहे. गोव्याचा स्पर्धेतील पहिला सामना 12 रोजी आंध्रविरुद्ध होईल, त्यानंतर बिहार (13 नोव्हेंबर), केरळ (15 नोव्हेंबर), तमिळनाडू (17 नोव्हेंबर), अरुणाचल प्रदेश (19 नोव्हेंबर), छत्तीसगड (21 नोव्हेंबर) व हरियाना (23 नोव्हेंबर) या संघांविरुद्ध गोव्याचा संघ खेळेल.
गोवा संघ असा
सुयश प्रभुदेसाई (कर्णधार), सिद्धेश लाड (उपकर्णधार), स्नेहल कवठणकर, वैभव गोवेकर, ईशान गडेकर, दीपराज गावकर, तुनीष सावकार, एकनाथ केरकर (यष्टिरक्षक), समर दुभाषी (यष्टिरक्षक), लक्षय गर्ग, अर्जुन तेंडुलकर, फेलिक्स आलेमाव, ऋत्विक नाईक, मोहित रेडकर, दर्शन मिसाळ, वेदांत नाईक, अमुल्य पांड्रेकर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.