Suryakumar Yadav: 'चेंडूचा रंगही तोच अन् बॉलरही तेच, तरी...' सूर्याची IND vs AUS मॅचनंतर लक्षवेधक प्रतिक्रिया

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार यादवने अर्धशतक केल्यानंतर मनमोकळी प्रतिक्रिया दिली आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Suryakumar Yadav on his Fifty during India vs Australia 1st ODI Match at Mohali:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मोहालीला झाला. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून ४ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली, त्यात सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. त्यामुळे या खेळीने सूर्यकुमारलाही दिलासा दिला आहे.

टी२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारची वनडेतील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर टीकाही झाली आहे. त्यातच तो मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात पहिल्या चेंडूंवर शुन्यावर बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष होते.

अखेर त्याने 49 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत 50 धावांची खेळी केली आणि भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पण भारताला 19 चेंडूत 12 धावांची गरज असताना तो बाद झाला.

Suryakumar Yadav
IND vs AUS: गिल-ऋतुराजने बाउंड्रीत नाही, तर चक्क पळून काढल्या 4 धावा, वाचा नक्की झालं काय

दरम्यान, सामना भारताने जिंकल्यानंतर सूर्यकुमारने टी20 आणि वनडे प्रकारात एकाच प्रकारचा चेंडू असूनही खेळताना त्याच्याकडून काय चूक होत होती, याबद्दलही सांगितले आहे.

तो म्हणाला, 'हा प्रकार खेळायला सुरुवात केल्यापासून सामना संपवणे स्वप्न राहिले आहे. मी शक्यतेवढा शेवटपर्यंत टिकून फलंदाजी करण्याचा आणि संघासाठी सामना संपवण्याचा प्रयत्न केला. मी सामना आज संपवू शकलो नाही, पण मला माझी नवीन भूमिका आवडली.'

'मला काय होत आहे, याबद्दल नेहमीच मला प्रश्न पडायचा. चेंडूचा रंग सारखाच आहे, संघ सारखाच आहे, गोलंदाजही सारखेच आहेत. पण कदाचीत मी काहीशी घाई करत होतो. मी विचार केला की थोडा वेळ घेऊन खेळू. स्वत:ला शांत करून आणि हळू हळू परिस्थिती लक्षात घेत जास्तीत दास्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.'

Suryakumar Yadav
IND vs AUS: सरावाला सुट्टी नाही! पहिली वनडे जिंकताच अश्विनची रात्री बॅटिंग प्रॅक्टिस, पाहा Video

दरम्यान, या खेळीदरम्यान सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आवश्यक तो आदर देत एकही स्विप शॉट खेळला नाही. त्याने चंद्रकांत पंडीत यांच्या मार्गदर्शनालाही श्रेय दिले.

याबद्दल तो म्हणाला, 'मला वाटते मी पहिल्यांदाच स्विप शॉट खेळला नसेल. हे चंदू पंडीत यांच्या शाळेतून आले आहे. सलामीवीरांना फलंदाजी करताना पाहून मजा आली. मला त्यांची लय कायम करायची होती आणि शेवटपर्यंत फलंदाजी करून भारताला विजय मिळवून द्यायचा होता.'

सूर्यकुमार या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. त्याने पाचव्या विकेटसाठी कर्णधार केएल राहुलबरोबर महत्त्वपूर्ण 80 धावांची खेळी केली होती. केएल राहुलनेही नाबाद 58 धावांची खेळी केली.

तसेच त्यापूर्वी ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी 142 धावांची सलामी भागीदारी करत दमदार सुरुवात दिली होती. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान 49 व्या षटकात सहज पार करता आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com