R Ashwin Batting Practice after India won 1st ODI match against Australia at Mohali:
शुक्रवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीला झालेल्या पहिल्या वनडेत 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, या सामन्यातून आर अश्विनचे भारताच्या वनडे संघात पुनरागमन झाले.
अश्विनने तब्बल 610 दिवसांनी भारताकडून वनडे सामना खेळला. यापूर्वी तो जानेवारी 2022 मध्ये वनडे खेळलेला. मात्र अक्षर पटेल आशिया चषकावेळी दुखापतग्रस्त झाल्यानंतर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात संधी मिळाली. अश्विननेही ही संधी मिळाल्यानंतर जोरदार मेहनतीला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना जिंकल्यानंतर अश्विन रात्री उशीरा नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसला होता. तो फलंदाजी सराव करत असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत होता.
अश्विनचा शुक्रवारी रात्री सराव करतानाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्या या कृतीचे समालोचक अभिषेक नायर आणि मार्क वॉ यांनी कौतुक केले आहे.
ऑफ स्पिनर असलेला अश्विन खालच्या फळीतील उपयुक्त फलंदाजही समजला जातो. त्याने अनेकदा खालच्या फळीत फलंदाजी करताना महत्त्वपूर्ण खेळीही केल्या आहेत. दरम्यान, अश्विन भारताच्या कसोटी संघातील जरी नियमित खेळाडू असला, तरी गेल्या 20 महिन्यांपासून वनडे सामना खेळला नव्हता.
मात्र, वर्ल्डकप 2023 पूर्वी अचानक आशिया चषक खेळताना अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला. आता त्याच्या वर्ल्डकप 2023 मध्ये खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आता जर वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून अक्षर बाहेर झाला, तर अश्विनला वर्ल्डकपसाठीही भारतीय संघात संधी मिळू शकते. वर्ल्डकप 2023 साठी संघ निश्चित करण्याची अंतिम तारिख 28 सप्टेंबर आहे.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या सामन्यात अश्विनने मार्नस लॅब्युशेनची 39 धावांवर महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 4.70 च्या इकोनॉमी रेटने 47 धावा दिल्या आणि लॅब्युशेनची विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.