South Africa vs India, 2nd T20I Match at Gqeberha, Suryakumar Yadav Record:
मंगळवारी (12 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने भारतीय संघाविरुद्ध गेकेबेरा येथे झालेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. पण असे असले तरी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यादरम्यान काही वैयक्तिक विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून सूर्यकुमारने 36 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने या खेळीदरम्यान आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट कारकिर्दीत 2000 धावांचा टप्पा पार केला.
आता त्याने 59 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 56 डावात 44.36 च्या सरासरीने 2041 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याबाबतीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराटनेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 56 डावात 2000 धावा पूर्ण केल्या होत्या.
तथापि, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या नावावर संयुक्तरित्या आहे. या दोघांनीही प्रत्येकी 52 डावात 2000 धावा केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात कमी डावात 2000 धावा करणारे क्रिकेटपटू
52 डाव - बाबर आझम
52 डाव - मोहम्मद रिझवान
56 डाव - विराट कोहली
56 डाव - सूर्याकुमार यादव
58 डाव - केएल राहुल
दरम्यान, सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 वी धाव 1164 वा चेंडू खेळताना पूर्ण केली. त्यामुळे तो सर्वात कमी चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत त्याने ऍरॉन फिंचला मागे टाकले आहे. फिंचने 1283 चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 धावा केल्या होत्या.
सर्वात कमी चेंडूत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा करणारे क्रिकेटपटू
1164 चेंडू - सूर्यकुमार यादव
1283 चेंडू - ऍरॉन फिंच
1304 चेंडू - ग्लेन मॅक्सवेल
1398 चेंडू - डेव्हिड मिलर
1415 चेंडू - केएल राहुल
सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून 2000 धावा करणारा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापूर्वी असा विक्रम विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलने केला आहे. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 4008 धावा केल्या आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू
4008 धावा - विराट कोहली (107 डाव)
3853 धावा - रोहित शर्मा (140 डाव)
2256 धावा - केएल राहुल (68 डाव)
2041 धावा - सूर्यकुमार यादव (56 डाव)
सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आत्तापर्यंत 5 टी20 सामने खेळले आहेत. या ५ टी२० सामन्यांपैकी त्याने चार सामन्यात 50 धावांचा टप्पा पार केला आहे.
त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या जॉनी बेअरस्टो, मोहम्मद रिझवान आणि डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. या तिघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये 4 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे.
टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक वेळा 50 धावा पार करणारे क्रिकेटपटू
4 - जॉनी बेयरस्टो (13 डाव)
4 - मोहम्मद रिझवान (11 डाव)
4 - डेव्हिड वॉर्नर (15 डाव)
4 - सूर्याकुमार यादव (5 डाव)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.