South Africa vs India, 2nd T20I Match at Gqeberha:
मंगळवारी (12 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. गेकेबेरा येथे झालेल्या या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यातही काहीवेळ पावसाचा व्यत्यय आला होता. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 7 बाद 180 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 13.5 षटकात पूर्ण केले.
या सामन्यात 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर रिझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रित्झके यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी आक्रमक खेळ करत पहिल्या तीन षटकांच्या आतच 40 धावांचा टप्पा पार केला होता.
मात्र, चांगल्या सुरुवातीनंतर मॅथ्यू 16 धावांवर धावबाद झाला. पण नंतर हेंड्रिक्सने कर्णधार एडेन मार्करमला साथीला घेतले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण मार्करमला 8 व्या षटकात मुकेश कुमारने बाद केले. मार्करम 17 चेंडूत 30 धावा करून माघारी परतला.
पुढच्याच षटकात कुलदीप यादवने चांगला खेळ करणाऱ्या रिझा हेंड्रिक्सला बाद केले. त्यामुळे त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. पण असे असले तरी त्याच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेला विजय सोपा झाला. हेंड्रिक्सने 8 चौकार आणि 1 षटकारासह 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. 10 व्या षटकात हेन्रिक क्लासेनचा अडखळा मोहम्मद सिराजने दूर केला.
मात्र, नंतर डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टबने डाव पुढे नेला. मात्र 13 व्या षटकात मिलर 12 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. अखेरीस स्ट्रिस्टन स्टब्स आणि अँडिल फेहलुकवायोने आक्रमण केले आणि 14 व्या षटकातच दक्षिण आफ्रिकेचा विजय पक्क केला. स्टब्स 12 चेंडूत 14 धावांवर आणि फेहलुकवायो 4 चेंडूत 10 धावांवर नाबाद राहिला.
भारताकडून मुकेश कुमारने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण भारताने सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांच्या विकेट्स पहिल्या दोन षटकातच गमावल्या. दोघेही शुन्यावर बाद झाले. पण नंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरत ४९ धावांची भागीदारी केली.
मात्र, तिलकला ६ व्या षटकात गेराल्ड कोएत्झीने 29 धावांवर बाद केले. यानंतर मात्र कर्णधार सूर्यकुमार आणि रिंकू सिंगची जोडी जमली. या दोघांनीही आक्रमक खेळ केला. त्यांनी झटपट खेळत अर्धशतकी भागीदारी केल्याने भारताने 120 धावांचा टप्पा 13 षटकातच पार केला.
मात्र, अर्धशतक पूर्ण केलेल्या सूर्यकुमारला 14 व्या षटकात ताब्राईज शम्सीने चकवले. त्यामुळे त्याचा झेल मार्को यान्सिनने घेतला. सूर्यकुमारने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 36 चेंडूत 56 धावा केल्या. त्याच्यापोठापाठ लगेचच जितेश शर्मा 1 धावेवर बाद झाला.
पण या विकेटचा परिणाम रिंकूने आपल्या फलंदाजीवर होऊ दिला नाही. त्याला रविंद्र जडेजाने साथ दिली होती. पण जडेजा अखेरच्या षटकात 14 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कोएत्झीने अर्शदीप सिंगला बाद केले.
यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ सामना थांबला होता. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाला वापर करावा लागला. रिंकू त्यावेळी 39 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावांवर नाबाद होता.
दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्को यान्सिन, लिझाड विल्यम्स, ताब्राईज शम्सी आणि एडेन मार्करम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.