Soha Ali Khan shares story of Father Mansoor Ali Khan Pataudi's finest test inning at Melbourne cricket ground:
भारतातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये नेहमीच मन्सूर अली खान पतौडी म्हणजेच नवाब पतौडी यांचेही नाव घेतले जाते. भारताचे माजी कर्णधार असेलल्या नवाब पतौडी यांना टायगर पतौडी या नावानेही ओळखले जायचे.
भोपाळचे असलेले टायगर पतौडी यांचा 5 जानेवारीला वाढदिवस असतो. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तच त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोहा अली खान पतौडीने खास पोस्ट शेअर केली आहे.
तिने वडिलांबरोबरचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. तसेच तिचा पती आणि मुलीबरोबर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला भेट दिल्यानंतरचा फोटोही शेअर केला आहे. तिने टायगर पतौडी यांच्याशी जोडलेली मेलबर्नवरील आठवणही कॅप्शनमध्ये तिने लिहिली आहे.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले की 'आब्बांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला त्यांच्या आवडत्या स्टेडियमला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडला भेट देणेच सर्वात योग्य वाटले.'
'त्यांनी अनेक कसोटी शतके केली, पण 1967-68 च्या दौऱ्यातील मेलबर्नवर केलेली 75 धावांची खेळी अनेक जण त्यांची सर्वोत्तम खेळी असल्याचे म्हणतात, जी एका शतकाच्या तुलनेचीच होती. त्यावेळी ते जेव्हा फलंदाजीला आले, तेव्हा भारताने 25 धावात 5 विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यांना रनरची गरज भासली होती, कारण त्यांना हॅमस्ट्रिंगची समस्या झाली होती.'
'ते त्यांचे फ्रंट-फुट शॉट्सही खेळू शकत नव्हते आणि तरी त्यांनी भारताला 162 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यांनी त्यादिवशी केलेली 75 धावांची खेळी ही विस्डेन आशिया क्रिकेटच्या अव्वल 25 भारतीय कसोटी खेळीमध्ये 14 व्या क्रमांकावर आहे. 'एक अशी खेळी जी एका पायाने आणि एका डोळ्याने खेळण्यात आली होती.' वाढदिवसाच्या शुभेच्छा अब्बा.'
मेलबर्नला 1968 साली झालेल्या कसोटीत पतौडी यांनी शानदार खेळी केली असली, तरी त्या सामन्यात भारतीय संघाला एक डाव आणि 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की पतौडी यांची एका डोळ्याची नजर अत्यंत कमजोर होती, पण असे असतानाही त्यांनी भारताकडून 14 वर्षे क्रिकेट खेळले. 1961 साली इंग्लंडमध्ये एका कार अपघातात त्यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपूर्ण 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकाच डोळ्याने क्रिकेट खेळले.
त्यांना वयाच्या 21 व्या वर्षीच भारतीय संघाच्या कर्णधारपदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी 1961 ते 1975 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना 46 कसोटी सामन्यांमध्ये 6 शतके आणि 16 अर्धशतकांसह 2793 धावा केल्या.
तसेच त्यांनी 40 सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना 9 सामन्यांत विजय मिळवला, तर 19 सामन्यांत पराभव स्विकारला. तसेच 12 सामने अनिर्णित राहिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.