Nawab of Pataudi Birthday: भारताला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभला आहे. या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये मन्सूर अली खान पतौडी म्हणजेच नवाब पतौडी यांचीही गणना होते. त्यांना टायगर पतौडी म्हणूनही ओळखले जायचे. आज त्यांची 82वी जयंती आहे. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे झाला होता.
विशेष म्हणजे पतौडी यांची एका डोळ्याची नजर कमी होती. पण असे असले तरी त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये आपले नाव 14 वर्षे गाजवले. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच कसोटी पदार्पणही झाले नसताना त्यांचा अपघात झाला होता.
1961 साली ते इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेले असताना एका संध्याकाळी त्यांचा कार अपघात झाला या अपघातात त्यांना त्यांचा उजवा डोळा गमवावा लागला होता.
पण असे असले तरी त्यांनी त्यांची जिद्द हरली नाही आणि त्यांनी त्यानंतरही क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकत भारताकडून पदार्पण केले. त्यांनी डिसेंबर 1961 मध्ये दिल्लीमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
पतौडी यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी तीनच कसोटी सामने खेळल्यानंतर त्यांना भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यांनी 21 वर्षे आणि 77 दिवस एवढे वय असताना भारताचे पहिल्यांदा नेतृत्व केले होते. त्यामुळे ते भारताचे सर्वात युवा कर्णधार ठरले होते. आजही त्यांचा हा विक्रम अबाधित आहे.
पतौडी यांनी त्यांच्या कारकिर्दीत 46 कसोटी सामने खेळले. यातील 40 सामन्यांत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. त्यांनी या 40 सामन्यांपैकी 9 सामन्यांत विजय मिळवला, तर 19 सामन्यांत पराभव स्विकारला. तसेच 12 सामने अनिर्णित राहिले.
त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा परदेशात कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. 1968 साली न्यूझीलंडमध्ये भारताने मायदेशाबाहेर पहिला कसोटी मालिका विजय साजरा केला होता.
मन्सूर अली खान पतौडी यांचे वडील इफ्तिखर अली खान पतौडी हे देखील क्रिकेटर होते. त्यांनी भारत आणि इंग्लंड संघाकडून क्रिकेट खेळले आहे. मन्सूर अली खान पतौडी यांनी त्यांच्या कारकिर्दीत 46 कसोटी सामन्यांमध्ये 6 शतके आणि 16 अर्धशतकांसह 2793 धावा केल्या.
त्यांनी एकूण 310 प्रथम श्रेणी सामनेही खेळले. यात त्यांनी 15425 धावा केल्या. तसेच 7 लिस्ट ए सामन्यांत 210 धावा केल्या. त्यांनी 1975 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यांचे 2011 साली दीर्घआजाराने निधन झाले.
पतौडी यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते. त्यांना भारत सरकारकडून अर्जून पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.