Simona Halep suspended from Tennis for Four Years:
टेनिस विश्वाला धक्का देणारी बातमी मंगळवारी आली असून रोमानियाची स्टार टेनिसपटू सिमोना हालेप हिच्यावर डोपिंग प्रकरणातील दोन आरोपांमुळे 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 31 वर्षीय सिमोना हालेप माजी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर राहिलेली खेळाडू आहे.
दरम्यान, तिच्यावरील बंदीबाबत इंटरनॅशनल टेनिस इंटिग्रिटी एजन्सीने मंगळवारी माहिती दिली आहे.
अमेरिकन ओपन 2022 स्पर्धेवेळी घेण्यात आलेल्या डोपिंग टेस्टमध्ये तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तेव्हापासून ती निलंबित आहे. तिच्या सॅम्पलमध्ये रोक्साडुस्टेट पदार्थ सापडला होता.
युरोपियन युनियनमध्ये रोक्साडुस्टेट ड्रगचा वैद्यकिय वापर केला जातो. किडनीच्या आजारासाठी या ड्रगच वैद्यकिय वापर केला जातो. तसेच साकलिस्ट आणि लांब पल्ल्याचे धावपटूंकडून डोपिंगसाठी हे ड्रग वापरले जाते.
त्यानंतर मे महिन्यात हालेपवर दुसऱ्यांदा डोपिंगचा आरोप केला गेला. तिच्या ऍथलिट बायोलॉजिकल पासपोर्टमधील अनियमिततेसंबधित तिच्यावर दुसऱ्यांदा डोपिंगचा आरोप झाला होता. यानंतर दोन स्वतंत्र न्यायाधिकरणाने तिच्यावरील आरोप कायम केले आहेत.
त्यामुळे आता दोन वेळची ग्रँडस्लॅम विजेती सिमोना हालेपला ऑक्टोबर 2022 पासून लागलेल्या 4 वर्षांच्या बंदीमुळे 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रोफेशनल टेनिस खेळू शकणार नाही.
दरम्यान, आयटीआयएने घातलेल्या बंदीविरुद्ध हालेप दाद मागू शकते. पण तिने दाद मागितल्यानंतरीही अंतिम निर्णय येईपर्यंत तिच्यावरील बंदी कायम असणार आहे.
तथापि, हालेपने हा निर्णय आल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीकी ती या निर्णयाविरुद्ध दाद मागणार आहे. तिने म्हटले की गेल्यावर्षी तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण सामना झाला, पण तिची लढाई अजूनही सुरू आहे.
तसेच तिने म्हटले आहे की तिने जाणूनबुजून असा कोणताही प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले नाही. तिने म्हटले की तिला हा बंदीचा निर्णय मान्य नसून ती याविरुद्ध अपील करणार आहे.
हालेपने 2018 साली फ्रेंच ओपन आणि 2019 साली विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. तसेच तिने अनेक विजेतीपदेही जिंकली आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.