

IND vs NZ 1st Test, Shubman Gill: न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय कर्णधार शुभमन गिलचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. गिल अत्यंत संयमी आणि देखणी फलंदाजी करत होता; तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी तो आपल्या शतकापासून केवळ दोन धावा दूर असतानाच किवी वेगवान गोलंदाज जेकब डफीने त्याला त्रिफळाचित केले.
गिल 146 चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 98 धावा काढून माघारी परतला. यासह गिलच्या नावावर एका अशा नकोशा विक्रमाची नोंद झाली, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली (Virat Kohli) यांसारख्या दिग्गज कर्णधारांचाही समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 90 ते 99 धावांच्या दरम्यान बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत आता शुभमन गिल सामील झाला. यापूर्वी नरी कॉन्ट्रॅक्टर, मन्सूर अली खान पतौडी, कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली हे कर्णधार शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाले. विशेष म्हणजे, कसोटी इतिहासात 98 धावांवर बाद होणारा गिल हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. याआधी 1983 मध्ये कपिल देव वेस्ट इंडिजविरुद्ध सेंट जॉन्स येथे, तर 2010 मध्ये एमएस धोनी न्यूझीलंडविरुद्ध नागपूर कसोटीत 98 धावांवर बाद झाले होते.
या अनोख्या यादीत काही भारतीय कर्णधार असेही आहेत, ज्यांचे शतक अवघ्या एका धावेने हुकले होते. 2002 मध्ये सौरव गांगुली इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटीत, तर 2012 मध्ये एमएस धोनी इंग्लंडविरुद्धच नागपूर कसोटीत 99 धावांवर बाद झाले होते. कर्णधार म्हणून शतकाजवळ जाऊन बाद होण्याच्या बाबतीत धोनी सर्वाधिक दुर्देवी ठरला असून, तो कसोटीत 90, 92, 98 आणि 99 या धावसंख्यांवर बाद झाला.
सचिन तेंडुलकरही कर्णधार असताना दोनदा शतकाजवळ येऊन बाद झाला होता; 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 92 धावांवर, तर 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानखेडेवर 97 धावांवर त्याची खेळी संपुष्टात आली होती. विराट कोहली देखील 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम येथे 97 धावांवर बाद झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.