

Shoaib Akhtar statement on India Bowlers : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी धुव्वा उडवल्यानंतर क्रिकेट विश्वातून उमटणारे पडसाद थांबण्याचे नाव घेत नाहीत. भारताच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय गोलंदाजीवर सडकून टीका केली आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवण्याची क्षमता नाही, अशा शब्दांत त्याने टीम इंडियाची खिल्ली उडवलीय.
वेगवान गोलंदाजांचा उडाला फज्जा
अहमदाबादमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १८७ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये भारताचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांची गोलंदाजी विशेषतः महागात पडली. या दोघांनी मिळून ६ षटकांत तब्बल ७७ धावा बहाल केल्या.
यावर भाष्य करताना अख्तर म्हणाला, "हे गोलंदाज ताशी १२० किमी वेगाने गोलंदाजी करत आहेत. "स्वतःला माल्कम मार्शल समजताय का?", जे द. आफ्रिकेच्या फलंदाजांना घाबरवू शकतील? अशा संथ गतीने गोलंदाजी केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर फटकेबाजी होणारच." अख्तरच्या मते, डेथ ओव्हर्समध्ये भारताकडे धारदार वेगवान गोलंदाजीचा अभाव स्पष्टपणे दिसून आला.
केवळ वेगवान गोलंदाजच नव्हे, तर भारताचा 'ट्रम्प कार्ड' मानला जाणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती देखील या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. वरुणने ४ षटकांत ४७ धावा दिल्या.
अख्तरने त्याच्या वेगावर बोट ठेवत म्हटले की, "वरुणची खरी ताकद ९७-९८ किमी प्रतितास वेग आहे, पण तो ९४ किमी वेगाने चेंडू टाकत होता. इतक्या संथ वेगावर डेवाल्ड ब्रेविस सारखे फलंदाज न बघता षटकार ठोकणारच." वरुण आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजीमध्ये खूप साम्य असल्याने भारतीय आक्रमणात विविधतेची कमतरता असल्याचेही त्याने नमूद केले.
भारतीय संघात सध्या मॅच-विनर गोलंदाजांची उणीव भासत असल्याचे सांगत अख्तरने कुलदीप यादवचे समर्थन केले आहे. कुलदीप हा हवेतच फलंदाजांना चकवण्याची क्षमता ठेवतो, त्यामुळे त्याला तातडीने संघात स्थान द्यायला हवे, असे त्याचे मत आहे.
२६ फेब्रुवारी रोजी चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या पुढच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन आपल्या रणनीतीत बदल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने भारतीय गोलंदाजीची 'पोलखोल' केली असल्याची जळजळीत टीका अख्तरने केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.