Shafali Verma 12th CBSE Result: काही दिवसांपूर्वीच CBSE बोर्डाचे 12 वीचे निकाल जाहीर झाले आहेत. अशातच भारतीय महिला संघाची युवा क्रिकेटपटू शफाली वर्मानेही आनंदाची बातमी दिली आहे. तिने ती 12 वीची परिक्षा उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाल्याचे सांगितले आहे.
19 वर्षीय शफालीने तिची 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षेचे गुणपत्रक हातात घेत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये तिने 12 वीची परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
तिने लिहिले आहे की 'साल 2023 मध्ये अजून एक 80+ मारले आहेत. पण यावेळी 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षेत. मी हा निकाल पाहून खूप खुश आहे. आता मी माझ्या सर्वात आवडत्या क्रिकेट विषयासाठी सर्वोत्तम देण्यासाठी उत्सुक आहे.'
शफलीने शेअर केलेल्या फोटोतून दिसते की ती उत्तीर्ण झालेले विषय हिंदी, इंग्लिश, योगा, पेंटिंग आणि फिजिकल एज्युकेशन असे आहेत.
शफलीच्या नेतृत्वाखाली याचवर्षी भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने 29 जानेवारी 2023 रोजी पहिल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. या स्पर्धेत शफालीची कामगिरीही चांगली झाली. तिने 7 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह 172 धावा केल्या होत्या. ती या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज होती.
शफालीने अवघ्या वयाच्या 15 व्या वर्षीच सप्टेंबर 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने वरिष्ठ भारतीय महिला संघाचे टी20, वनडे आणि कसोटी अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे.
शफालीने भारताकडून दोन कसोटी सामने खेळले असून तीन अर्धशतकांसह 242 धावा केल्या आहेत. तसेच तिने 21 वनडे सामने खेळले असून 4 अर्धशतकांसह 531 धावा केल्या आहेत. याशिवाय तिने 56 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 5 अर्धशतकांसह 1333 धावा केल्या. त्याचबरोबर तिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 7 विकेट्सही घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.