WPL 2023: शफाली आऊट की नॉट आऊट? कॅप्टनचाही राग अनावर; Final मध्ये 'नो बॉल'वरून ड्रामा

Delhi Capitals vs Mumbai Indians: वूमन्स प्रीमियर लीग 2023 च्या अंतिम सामन्यात शफली वर्माची विकेट वादग्रस्त ठरली.
Shafali Verma Wicket
Shafali Verma WicketDainik Gomantak
Published on
Updated on

Shafali Verma Wicket Controversy: रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिल्या वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने विजेतेपदावर नावही कोरले. मात्र, असे असले तरी या सामन्याच्या सुरुवातीलाच एक नाट्यमय घटना घडली.

या सामन्याच्या दुसऱ्याच षटकात इजी वाँगने घेतलेली शफली वर्माची विकेट वादग्रस्त ठरली. झाले असे की दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंगसह शफली सलामीला फलंदाजीसाठी मैदानात आली.

यावेळी दुसऱ्या षटकात मुंबईकडून गोलंदाजीसाठी इजी वाँग आली. पण तिच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर शफलीने षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तिने चौकार ठोकला. पण त्यानंतरचा चेंडू इजीने फुलटॉस टाकला, ज्यावर शफालीने मोठा फटका मारला. पण तो चेंडू पाँइंट्सच्या क्षेत्रात एमेलिया केरने झेलला. त्यामुळे शफलीला 11 धावांवरच विकेट गमवावी लागली.

Shafali Verma Wicket
WPL 2023: मुंबई-दिल्लीला कोटींचे बक्षीस, तर पुरस्कार विजेतेही लखपती; संपूर्ण लिस्ट पाहा एका क्लिकवर

पण शफलीची विकेट गेलेला चेंडू नो बॉल असल्याचे शफाली आणि लेनिंगला वाटले होते. त्यामुळे त्यांनी रिव्ह्यूचीही मागणी केली. पण तिसऱ्या पंचांनी घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला. इजीने शफलीला टाकलेला चेंडू तिच्या कंबरेजवळून जात होता. त्यामुळे तो कंबरेच्या वर आहे की खाली यावर अनेकांची मतं विभागली गेली.

पण तिसऱ्या पंचांनी तो नो बॉल नसल्याचे घोषित करत गोलंदाजांच्या बाजूने म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या बाजूने दिला. यावेळी लेनिंगचाही राग अनावर झाला होता. तिने पंचांशीही याबद्दल रागात चर्चा केली. शफलीही निराश होत पॅव्हेलियनमध्ये परतली.

या विकेटवर क्रिकेट चाहत्यांचीही मतं विभागलेली दिसली. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया दिली. काहींनी तर मुंबई इंडियन्स आणि नो बॉल हे नाट्य नेहमीच कसे घडते, असे प्रश्नही उपस्थित केले. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांमध्ये नो बॉलमुळे वाद घडला आहे.

Shafali Verma Wicket
WPL 2023: ऑरेंज कॅप लेनिंगला, तर पर्पल कॅप मॅथ्यूजला; पाहा शर्यतीत राहिलेल्या टॉप 5 जणींची लिस्ट

इजीने शफालीनंतर एलिस कॅप्सी आणि जेमिमाह रोड्रीग्स यांच्याही विकेट्स फुलटॉसवर घेतल्या. यानंतर मात्र दिल्लीचा संघ फार सावरू शकला नाही. त्यातच एक बाजू सांभाळलेली लेनिंगही 35 धावांवर धावबाद झाली.

दिल्लीची अवस्था 9 बाद 79 धावा अशीही एका क्षणी झालेली. मात्र शिखा पांडे आणि राधा यादव यांनी अखेरच्या विकेटसाठी नाबाद 52 धावांची भागीदारी केली आणि दिल्लीला समाधानकारत 131 धावांपर्यंत पोहचवले. या सामन्यात मुंबईकडून इजी वाँगबरोबर हेली मॅथ्यूजनेही 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून नतालिया स्किव्हर-ब्रंटने 55 चेंडूत 60 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरने 37 धावांची खेळी केली. या दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 72 धावांची भागीदारी झाली.

तसेच हरमनप्रीत बाद झाल्यानंतर अखेरीच मोक्याच्या क्षणी एमेलिया केरनेही नतालियाला चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने 19.3 षटकात 3 विकेट्स गमावत 134 धावा केल्या आणि सामना जिंकत विजेतेपद नावावर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com