

टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजयानंतर संपूर्ण भारत उत्सवात बुडाला आहे. या ऐतिहासिक विजयाचा सर्वात मोठा शिल्पकार ठरला तो म्हणजे केरळचा सुपुत्र संजू सॅमसन. स्पर्धेच्या सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनमध्ये पहिली पसंती नसतानाही, जेव्हा संधी मिळाली तेव्हा संजूने त्याचे सोने केले. केवळ ५ सामन्यांत ३२१ धावा ठोकणाऱ्या संजूला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' या किताबाने गौरवण्यात आले.
अंतिम सामन्यात त्याने खेळलेली ८९ धावांची खेळी भारताला तिसऱ्यांदा विश्वविजेता बनवण्यासाठी निर्णायक ठरली. मात्र, यशाच्या या शिखरावर पोहोचण्यापूर्वी संजूला अपमानाचा आणि नकाराचा जो सामना करावा लागला, तो अत्यंत वेदनादायी होता.
संजू सॅमसनच्या संघर्षाची कहाणी बऱ्याच अंशी दिग्गज विराट कोहलीशी साम्य दर्शवते. ज्याप्रमाणे विराटला दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) निवडकर्त्यांनी ज्युनियर स्तरावर नाकारले होते, अगदी तसाच अनुभव संजूच्या वाट्यालाही आला.
ज्युनियर क्रिकेटमध्ये एका स्पर्धेत ८ सामन्यांत ५०० हून अधिक धावा करूनही दिल्लीच्या अंडर-१३ संघात संजूला स्थान देण्यात आले नव्हते. या अन्यायाने संजूच्या कोवळ्या मनावर खोलवर परिणाम केला होता, परंतु या नकारानेच त्याला भविष्यातील चॅम्पियन बनवण्यासाठी जिद्द दिली.
संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ हे दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. आपल्या मुलावर दिल्लीत झालेल्या अन्यायाने ते हादरून गेले होते. मुलाचे क्रिकेटमधील स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी एक अत्यंत कठीण निर्णय घेतला.
त्यांनी दिल्ली पोलिसातील आपली सरकारी नोकरी सोडून 'स्वेच्छा निवृत्ती' (VRS) घेतली आणि संपूर्ण कुटुंब केरळमधील तिरुवनंतपुरम येथे स्थलांतरित झाले. एका सुरक्षित सरकारी नोकरीचा त्याग करून अनिश्चित भविष्य असलेल्या क्रिकेट कारकिर्दीसाठी केरळला जाणे हा मोठा जुगार होता, पण वडिलांचा संजूच्या प्रतिभेवर अढळ विश्वास होता.
केरळला परतल्यानंतर संजूने मागे वळून पाहिले नाही. अंडर-१३ स्तरावर केरळसाठी खेळताना त्याने ५ सामन्यांत तब्बल ९७३ धावा कुटल्या आणि संघाचे नेतृत्वही केले. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. २०१३ मध्ये आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला संधी दिली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्याच्या यशाचा मार्ग मोकळा झाला. रिजेक्शनचे दुःख आणि वडिलांचा त्याग या दोन गोष्टींनी संजूला मैदानात कधीही हार न मानण्याची ताकद दिली.
संजूच्या या देदीप्यमान कामगिरीवर स्वतः विराट कोहलीनेही त्याचे कौतुक केले आहे. विराटने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, "शानदार टूर्नामेंट! संजू सॅमसन, तू 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' या सन्मानासाठी पूर्णपणे पात्र आहेस. जेव्हा संघाला तुझी सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तू सर्वोत्तम खेळ केलास. चेट्टा (मोठ्या भावा), तुझ्या या यशाबद्दल मला खूप आनंद आहे." आज संजू सॅमसन हे नाव केवळ केरळचे नाही, तर संपूर्ण भारतीय क्रिकेटचे अभिमानस्थान बनले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.