

विमान प्रवास करताना सुरक्षेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते, मात्र अनेकदा काही प्रवासी या नियमांकडे दुर्लक्ष करून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच आकासा एअरच्या दिल्ली-गोवा विमानात घडली आहे. विमानाच्या शौचालयात धूम्रपान करणाऱ्या एका प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी आकासा एअरचे विमान दिल्लीहून गोव्याच्या दिशेने झेपावले होते. दरम्यान, विमान हवेत असताना दिल्लीत राहणाऱ्या एका प्रवाशाने विमानातील शौचालयात जाऊन विडी पेटवली. विमानाचे शौचालय हे धूर आणि आग रोखणाऱ्या उपकरणांनी सज्ज असते. त्यामुळे धूम्रपान सुरू असतानाच उपकरणांनी धोक्याचा इशारा दिला आणि विमानातील कर्मचारी सतर्क झाले. क्रू मेंबर्सनी तातडीने तपासणी केली असता, संबंधित प्रवाशाने विडी ओढल्याचे उघड झाले.
विमान गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मोपा एअरपोर्ट) सुरक्षितपणे लँड झाल्यानंतर, संबंधित प्रवाशाला सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात देण्यात आले. आकासा एअरच्या सुरक्षा व्यवस्थापकांनी या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत मोपा विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विमानात धूम्रपान करणे हा केवळ नियमांचा भंग नसून तो एक गंभीर 'सुरक्षा गुन्हा' मानला जातो. विमानातील मर्यादित ऑक्सिजन आणि दाबाच्या वातावरणात धूर किंवा आगीची ठिणगी मोठी दुर्घटना घडवू शकते.
विमान वाहतूक क्षेत्रात अशा कृत्यांकडे 'झिरो टॉलरन्स' धोरणाने पाहिले जाते. या घटनेमुळे पुन्हा एकदा विमान प्रवासातील शिस्त आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, विमान कंपन्यांनीही प्रवाशांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.