GCA Premier League Cricket: जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात साळगावकर क्रिकेट क्लबने धेंपो क्रिकेट क्लबवर पहिल्या डावात 54 धावांची आघाडी प्राप्त केली, मात्र फरदीन खान याच्या भेदक गोलंदाजीमुळे दुसऱ्या डावात त्यांची 3 बाद 15 अशी घसरगुंडी उडाली. त्यांची आता एकूण आघाडी 69 धावांची आहे.
सांगे येथील जीसीए मैदानावर गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी धेंपो क्लबने पहिल्या डावात 241 धावा केल्या. एकवेळ त्यांची 8 बाद 136 अशी दयनीय स्थिती होती. मात्र 98 धावांवर नाबाद राहिलेल्या विकास सिंगच्या झुंजार फलंदाजीमुळे धेंपो क्लबला पिछाडीचे अंतर कमी करता आले.
विकासने नवव्या विकेटसाठी फरदीन खान (21) याच्यासमेवत 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शेवटच्या विकेटसाठी विकासने 23 धावांची भागीदारी केली, परंतु पुंडलिक नाईक (1) बाद झाल्यामुळे त्याचे शतक दोन धावांनी हुकले. त्याने 166 चेंडूंतील खेळीत नऊ चौकार व एक षटकार मारला.
संक्षिप्त धावफलक ः साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः सर्वबाद 295 व दुसरा डाव ः 5 षटकांत 3 बाद 15 (फरदीन खान 3-14) विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब ः 80 षटकांत सर्वबाद 241 (अभिनव राणा 48, लक्षय गर्ग 25, विकास सिंग नाबाद 98, फरदीन खान 21, विजेश प्रभुदेसाई 4-47, अमूल्य पांड्रेकर 4-62).
जीनो क्लबची मदार फलंदाजांवर
जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या जीनो स्पोर्टस क्लबची मदार फलंदाजांवर आहे. एमसीसी संघाविरुद्ध विजय नोंदविण्यासाठी त्यांना सामन्याच्या शेवटच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी आणखी 203 धावांची गरज असून दुसऱ्या डावातील नऊ फलंदाज बाकी आहेत.
पर्वरी येथील जीसीए मैदानावर सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी त्यांनी 1 बाद 35 धावा केल्या होत्या. सलामीच्या ईशान गडेकरला एका धावेवर प्रतिस्पर्धी कर्णधार दर्शन मिसाळने त्रिफळाचीत बाद केल्यामुळे जीनो क्लबला धक्का बसला.
त्यापूर्वी, पहिल्या डावात 76 धावांनी पिछाडीवर पडलेल्या एमसीसी संघाला कालच्या बिनबाद 102 वरून सुमीरन आमोणकर व प्रथमेश गावस यांनी 111 धावांची सलामी दिली, पण नंतर त्यांचा डाव 5 बाद 161 असा गडगडला. पियुष यादव याने झुंजार 78 धावांची खेळी केल्यामुळे एमसीसी संघाला 313 धावांची मजल मारता आली.
पियुषने 117 चेंडूंतील खेळीत 11 चौकार मारले. त्याने वेदांत नाईक (22) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी 61, तर हेरंब परब (16) याच्यासह आठव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केल्यामुळे एमसीसीला दुसऱ्या डावातील आघाडी 237 धावांपर्यंत वाढवता आली.
संक्षिप्त धावफलक ः एमसीसी, पहिला डाव 86 व दुसरा डाव ः 95.5 षटकांत सर्वबाद 313 (सुमीरन आमोणकर 54, प्रथमेश गावस 56, शंतनू नेवगी 31, पियुष यादव 78, धीरज यादव 4-111, उदित यादव 3-73) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब ः पहिला डाव ः 162 व दुसरा डाव ः 14 षटकांत 1 बाद 35.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.