Prithvi Shaw Instagram Story: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या विविध कारणांनी चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच तो एका नवीन वादात अडकला होता. सेल्फी प्रकरणावरून त्याचा आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री सपना गिल आणि तिच्या मित्रांबरोबर मोठा वाद झाला होता. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांचेही सत्र पाहायला मिळाले.
दरम्यान, या प्रकरणावर सध्यातरी शॉ याने मौन बाळगले आहे. मात्र त्याने गुरुवारी इंस्टाग्रामवर एक क्रिप्टीक पोस्ट केल्याने आता याबद्दल चर्चा सुरू आहे. शॉ याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'काही लोक तुमच्यावर तोपर्यंतच प्रेम करतात, जोपर्यंत ते तुमचा उपयोग करू शकतात. त्यांचा फायदा संपल्यानंतर त्यांची निष्ठा संपते.'
आता शॉ याने ही इंस्टाग्राम स्टोरी नक्की कोणत्या हेतूने टाकली आहे, याबद्दल त्याने कोणतेही अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्याने ही स्टोरी टाकली आहे का, असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
गेल्या महिन्यात मुंबईमध्ये एका हॉटलच्या बाहेर शॉ आणि सपना गिल यांचे वाद होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर झाले होते. रिपोर्ट्सनुसार शॉ याने सपना आणि तिच्या मित्रांना सातत्याने सेल्फीसाठी त्रास दिल्याने सेल्फी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे हा वाद सुरु झाला होता.
दरम्यान, सपना आणि तिच्या मित्रांनी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांचा पाठलाग करत त्यांच्या कारवर बेसबॉल बॅटने हल्ला केला होता. असा आरोप शॉ आणि त्याच्या मित्राने केला होता. या प्रकरणात सपनाला आणि तिच्या मित्रांना अटकही केली होती. त्यांना काही दिवसांनी जामीनही मंजूर झाली होती.
पण जामीन मिळाल्यानंतर सपनानेही शॉ आणि त्याच्या मित्रांविरुद्धही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने शॉवर विनयभंग केल्याचा आरोपही केला होता.
शॉ गेल्या पावणे दोनवर्षापासून भारतीय संघातून दूर आहे. त्याला जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, मालिकेतील एकाही सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले नव्हते.
शॉने आत्तापर्यंत 5 कसोटी सामने खेळले असून 339 धावा केल्या आहेत. तसेच 6 वनडे सामने खेळले असून 189 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने एकमेव आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला असून त्याला यात एकही धाव करता आलेला नाही.
दरम्यान, आता तो आगामी आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. त्यासाठी त्याने तयारीही सुरु केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.