South Africa vs India, ODI Series, Best Fielder Medal Video:
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी (21 डिसेंबर) झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मेडलही देण्यात आले.
वर्ल्डकप 2023 पासून भारतीय संघाने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला मेडल देण्याची परंपरा चालू केली आहे. वर्ल्डकपमध्ये प्रत्येक सामन्यानंतर हे मेडल देण्यात आले, मात्र त्यानंतर प्रत्येक मालिकेनंतर प्रभावी क्षेत्ररक्षकाला हे मेडल दिले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली.
या भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील मेडल देण्याच्या सोहळ्याच्या व्हिडिओलाही चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शनला हे मेडल प्रदान करण्यात आले, याचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की या वनडे मालिकेत भारतीय संघाचे प्रभारी मुख्य प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी आधी भारतीय संघाने या मालिकेत केलेल्या आणि तिसऱ्या सामन्यात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. त्यानंतर क्षेत्ररक्षणाबद्दल क्षेत्ररक्षक प्रशिक्षक अजय रात्रा यांनी माहिती दिली. तसेच त्यांनीच सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे नावही घोषित केले.
रात्रा यांनी आधी सांगितले की या संपूर्ण मालिकेत चांगले क्षेत्ररक्षण झाले असून 12 झेल घेण्यात आले. यातील सर्वाधिक 6 झेल कर्णधार आणि यष्टीरक्षक केएल राहुलने घेतले.
तसेच संजू सॅमसनने 2 झेल घेतले, तर या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनने तिसऱ्या वनडेत एक शानदार झेल घेतला. तसेच राखीव क्षेत्ररक्षक म्हणून युजवेंद्र चहलने पण चांगली कामगिरी केली.
याबरोबरच ते म्हणाले की निर्णय अवघड होता, पण त्यांचा कल नेहमीच यष्टीरक्षकाच्या दिशेने होता, मात्र केएल राहुलने त्यांना सांगितले की झेल घेणे त्याच्यासाठी सामान्य होते, त्यामुळे हे मेडल साईला देऊ. यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी जल्लोष केला.
दरम्यान, मालिकेबद्दल सांगायचे झाले, तर या मालिकेतील पहिला सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता. तसेच दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने 8 विकेट्सने जिंकला. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक होता. या तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकाही जिंकली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.