KL Rahul and Keshav Maharaj Conversation during South Africa vs India, 3rd ODI at Paarl:
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
याच सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केएल राहुल आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू केशव महाराज यांच्यातील स्टंप माईकमध्ये कैद झालेले संभाषण ऐकू येत आहे.
झाले असे की भारताने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेचा संघ करत होता. यावेळी 34 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने विआन मुल्डरची विकेट घेतल्यानंतर आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी केशव महाराज उतरला.
दरम्यान तो फलंदाजीसाठी क्रीजवर येताच पार्लमधील बोलंड पार्क स्टेडियममध्ये 'आदीपुरुष' चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणे वाजायला लागले.
त्याचदरम्यान, केशव महाराज खेळपट्टी पाहात असताना यष्टीरक्षण करत असलेला भारताचा कर्णधार केएल राहुल त्याला म्हणाला, 'केशव भाई, जेव्हा पण तू येतोस, तेव्हा ते हेच गाणे वाजवतात ना.'
त्यावर केशवने 'हो' असे उत्तर दिले. त्यानंतर केएल राहुलने विचारले की जेव्हा तू गोलंदाजीला येतो, तेव्हा पण हेच गाणे वाजते का, त्यावर केशवनेही हो उत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, या सामन्यात केशव महाराज फलंदाजीत फार काही करू शकला नाही. तो 14 धावांवर बाद झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.5 षटकात 218 धावांवर सर्वबाद झाला.
दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झीने 81 धावांची खेळी केली, तर कर्णधार एडेन मार्करमने 36 धावा केल्या आणि हेन्रिक क्लासेनने 21 धावांची खेळी केली. याशिवाय कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 296 धावा केल्या. भारताकडून भारताकडून संजू सॅमसनने 108 धावांची शतकी खेळी केली.
तसेच तिलक वर्माने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर रिंकू सिंगने 38 धावा केल्या. त्याचबरोबर रजत पाटीदारने 22 आणि केएल राहुलने 21 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत ब्युरान हेंड्रिक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.