Sachin Tendulkar Reaction: गोव्याचा रणजी रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामातील पहिला सामना राजस्थानविरुद्ध गोवा क्रिकेट असोसिएशन ऍकेडमी ग्राऊंडवर झाला. या सामन्यातून गोव्याकडून अर्जुन तेंडुलकरने पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या रणजी सामन्यात शतकही झळकावले. त्याच्या या शतकाबद्दल आता त्याचे वडील आणि भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे.
सचिनने देखील 34 वर्षांपूर्वी मुंबईकडून खेळताना पदार्पणाच्या रणजी सामन्यात गुजरातविरुद्ध नाबाद 100 धावांची खेळी केली होती. आता त्याच्या या विक्रमाशी अर्जुननेही बरोबरी केली आहे.
दरम्यान, अर्जुनच्या शतकाबद्दल इन्फॉसिस ऍट 40 या कार्यक्रमादरम्यान बोलताना सचिन म्हणाला, 'मला आठवते, मी जेव्हा माझ्या वडिलांना बोलताना ऐकले होते, ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा मी भारतासाठी खेळणे सुरू केले होते.'
'त्यावेळी त्यांना कोणीतरी सचिनचे वडील म्हणून बोलावले होते. मी ते ऐकले आणि मग माझ्या वडिलांच्या मित्रांने त्यांना कसे वाटत आहे, असे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले होते की हा माझ्या आयुष्यातील गौरवाचा क्षण आहे. प्रत्येक वडिलांना वाटत असते की त्यांना त्यांच्या मुलांच्या कामामुळे ओळखले जावे.'
सचिन पुढे म्हणाला, 'अर्जुन सामन्य बालपण जगला नाही. काही काळ क्रिकेट खेळलेल्या एका क्रिकेटपटूचा मुलगा म्हणून त्याच्यासाठी हे सोपे नव्हते. याच कारणामुळे मी निवृत्ती घेतल्यानंतर मुंबईत मीडियाला मी एक संदेश दिला होता की अर्जुनला क्रिकेटच्या प्रेमात पडू द्या, त्याला ती संधी द्या.'
'तुम्ही त्याने कामगिरी केल्यावर तुम्ही त्याचा विविध विधानांसह पाठपुरावा करू शकता. पण त्याच्यावर दबाव आणू नका. कारण माझ्यावर कधीही माझ्या पालकांचा दबाव नव्हता.'
सचिनने त्याच्या पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याबद्दलही सांगितले. तो म्हणाला, 'माझ्या पालकांनी मला स्वातंत्र्य दिले की मी बाहेर जाऊन व्यक्त होऊ शकेल. त्यांच्या अपेक्षांचा कधीही दबाव नव्हता. त्यांनी फक्त प्रेरणा आणि पाठिंबा दिला आणि आम्ही पुढे कसे जाऊ, स्वत:ला उत्तम कसे बनवू याकडे लक्ष दिले. हेच आहे, जे मला वाटते त्यानेही करायला हवे. मी नेहमीच त्याला सांगत आलो आहे की हे तुझ्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.'
सचिनने अर्जुनबरोबर शतकापूर्वी काय चर्चा झालेली याबद्दलही उलगडा केला. सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अर्जुन ४ धावांवर नाबाद होता. त्यानंत त्याने दुसऱ्या दिवशी 120 धावांची खेळी केली.
सचिनने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या चर्चेबद्दल सांगितले की 'मी त्याला शतक करण्यासाठी सांगितले होते. तो 4 धावांवर फलंदाजी करत होता, त्याला नाईटवॉचमन म्हणून पाठवण्यात आले होते. त्याने मला विचारले की चांगली धावसंख्या काय असेल.'
'तेव्हा गोव्याने 5 बाद 210 धावा केल्या होत्या. मी म्हणालो 375 धावांपर्यंत तरी पोहचावेच लागेल. तो म्हणाला, नक्की का? मी त्याला उत्तर दिले की हो, तुला मैदानात खेळावे लागेल आणि शतक करावे लागेल. तुला विश्वास आहे का की तू तिथे जाऊन शतक करशील?'
प्रभुदेसाईबरोबर द्विशतकी भागीदारी
अर्जुनने दुसऱ्या दिवशी सुयश प्रभुदेसाईला चांगली साथ देताना 221 धावांची भागीदारीही रचली. सुयशने 212 धावांची खेळी केली. या दोघांच्या या भागीदारीमुळे गोव्याने पहिला डाव 9 बाद 547 धावांवर घोषित केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.