Rohit Sharma: 'हिटमॅन' इज बॅक! विश्वचषकाच्या धामधुमीत रोहित शर्माचा सराव करतानाचा Video Viral
Rohit Sharma Practice Video Viral : सध्या संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ कडे लागलेले असतानाच, भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा पुन्हा एकदा बॅट घेऊन मैदानात उतरला आहे.
जरी रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली, तरी आगामी आयपीएल २०२६ (IPL 2026) साठी त्याने आपली कंबर कसली आहे. सोशल मीडियावर रोहितच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, तो पुन्हा एकदा 'फॉर्म'मध्ये परतण्यासाठी सज्ज असल्याचे दिसत आहे.
मैदानात परतला 'हिटमॅन'
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर रोहित शर्मा क्रिकेटच्या मैदानापासून काही काळ दूर होता. जवळपास महिनाभर विश्रांती घेतल्यानंतर रोहित आता पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आला आहे एका स्थानिक मैदानावर रोहित काही इतर खेळाडूंसोबत सराव करताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० ला रामराम ठोकला असला, तरी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी तो पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडण्यास उत्सुक आहे. रोहितचा हा उत्साह पाहून चाहत्यांनी "राजा परत आला आहे," अशा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
२६ मार्चपासून आयपीएलचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२६ चा हंगाम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, म्हणजेच साधारण २६ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी समाधानकारक असली तरी त्यांना जेतेपदापर्यंत पोहोचता आले नव्हते.
मात्र, यंदा मुंबईने आपला संघ अधिक मजबूत केला असून रोहित शर्माचे पुनरागमन संघासाठी टॉनिक ठरणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहितने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली होती, त्यामुळे आयपीएलमध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा वर्तवली जात आहे.
गेल्या हंगामातील आकडेवारी
रोहित शर्मासाठी आयपीएल २०२५ चा हंगाम वैयक्तिकरित्या चांगला राहिला होता. त्याने १५ सामन्यांमध्ये सुमारे १४९ च्या स्ट्राइक रेटने ४१८ धावा कुटल्या होत्या. यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश होता.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. आता २०२६ च्या हंगामात रोहित आपला जुना अंदाज कायम राखत मुंबईला सहावे जेतेपद मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विश्वचषकाच्या रणधुमाळीत रोहितच्या या सरावाने प्रतिस्पर्धी संघांचे धाबे दणाणले आहेत.

