

भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक माजी आणि विद्यमान खेळाडूंनी रहाणेच्या योगदानाचे कौतुक केले असून, त्यात रोहित शर्मा याचाही समावेश आहे. रहाणेसोबत दीर्घकाळ ड्रेसिंग रूम शेअर केलेल्या रोहितने सोशल मीडियावर भावनिक संदेश लिहित आपल्या मित्राविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
रोहित शर्माने आपल्या संदेशात रहाणेच्या मेहनतीचा, शिस्तबद्ध वृत्तीचा आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचा विशेष उल्लेख केला. अनेक वर्षे भारतीय संघात एकत्र खेळताना रहाणेने संघासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक करत त्याने पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
रोहितने आपल्या संदेशात म्हटले की, अनेक वर्षे एकाच ड्रेसिंग रूममध्ये घालवल्यामुळे रहाणेने यश मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न इतरांपेक्षा वेगळे ठरले. उत्कृष्ट कारकिर्दीसाठी त्याने रहाणेचे अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या अजिंक्य रहाणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. भावनिक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. या घोषणेदरम्यान त्यांच्या भावना अनावर झाल्याचेही चाहत्यांना पाहायला मिळाले.
रहाणेने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय खेळी करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.
रोहित शर्माप्रमाणेच माजी कर्णधार विराट कोहली यानेही रहाणेच्या निवृत्तीवर भावनिक प्रतिक्रिया दिली. कसोटी क्रिकेटमधील भागीदारी आणि स्लिपमधील रहाणेच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे कौतुक करत विराटने त्याला भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू म्हटले. भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या योगदानाचा अभिमान बाळगावा, असेही त्याने नमूद केले.
अजिंक्य रहाणेची कारकीर्द केवळ धावसंख्येपुरती मर्यादित नव्हती. शांत स्वभाव, संकटाच्या वेळी जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता आणि संघभावना यामुळे त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाचा अध्याय संपला असला, तरी त्यांचे योगदान आणि आठवणी चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.