Rohan Bopanna-Matthew Ebden entered men’s doubles Semi-Final of Australian Open 2024:
ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना शानदार खेळ करत आहे. तो या स्पर्धेत ऑस्ट्रेलयन टेनिसपटू मॅथ्यू एब्डेनसह पुरुष दुहेरीत खेळत आहे. दरम्यान, बोपन्ना-एब्डेन या जोडीने बुधवारी (24 जानेवारी) या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
दुसऱ्या मानांकित बोपन्ना आणि एब्डेन जोडीने बुधवारी उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाची जोडी मॅक्सिमो गोन्झालेझ आणि आंद्रेस मोल्टेनी यांना पराभूत केले. बोपन्ना-एब्डेनने सहाव्या मानांकित गोन्झालेझ-मोल्टेनी यांना 6-4, 7-6 अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आणि उपांत्य फेरी गाठली.
दरम्यान, या विजयासह 43 वर्षीय रोहन बोपन्नाने जागतिक क्रमवारीत दुहेरीमध्ये पहिल्यांदाच पहिला क्रमांक निश्चित केला आहे.
विशेष म्हणजे त्याच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत तो पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर पोहचणार आहे. त्यामुळे भारतासाठीही त्याची ही कामगिरी ऐतिहासिक आहे.
बुधवारी 1 तास 46 मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीत बोपन्ना आणि एब्डेन यांनी पहिला सेट सहज जिंकला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये बोपन्नआ आणि एब्डेनला गोन्झालेझ-मोल्टेनी यांनी तगडे आव्हान दिले.
दोन्ही जोड्यांनी आपापव्या सर्व्ह राखण्यात यश मिळवले होते. त्यामुळे या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकरमध्ये हा सेट गेला. टायब्रेकरमध्ये बोपन्ना आणि एब्डेनने 7-5 असा विजय मिळवत सामनाही जिंकला. याबरोबरच उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले.
बोपन्ना आणि एब्डेन या जोडीचा उपांत्य सामना आता झँग झिझेन आणि थॉमस मॅचॅक या जोडीविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकला तर ते अंतिम सामन्यात प्रवेश करतील.
बोपन्ना आणि एब्डेन गेल्या काही महिन्यांपासून एकत्र खेळत असून त्यांनी गेल्यावर्षी अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धेतही अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान गेल्यावर्षी बोपन्नाने सानिया मिर्झासह मिश्र दुहेरीत खेळताना ऑस्ट्रेलियन ओपनमध्येच अंतिम सामना खेळला होता. मात्र त्या अंतिम सामन्यातही त्यांना उपविजेतेपद मिळाले होते. तो सानियाचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.